Stray dogs attack six people, including three young children, in Satara
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा परिसरात पाच दिवसांपूर्वीच ३ वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. हे म होत नाही तोच सातारा गावातील खंडोबा मंदिर लगतच्या गल्लीत बुधवारी दि.११) आणखी ३ चिमुकले आणि ३ तरुण अशा सहा जणांवर कुत्र्यांनी हल्ला करीत चावा घेतला. या घटनेनंतर तातडीने जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सातारा परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छांद सुरू आहे. प्रत्येक गल्लीत किमान सात-आठहून अधिक कुत्रे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी येणाऱ्या मनपाच्या पथकालाही हे कुत्रे गुंगारा देतात. त्यामुळे पथकाला रिकाम्या हातीच परतावे लागते. भरउन्हात मोकाट कुत्रे माणसांच्या अंगावर धाऊन जात आहे. शनिवारी सातारा भागातील एका ३ वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला केला. घरासमोर खेळत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे आता चिमुकल्यांना घराबाहेर पाठविणेही धोक्याचे ठरत आहे.
ही घटना होत नाही तोच, पाचव्याच दिवशी म्हणजे बुधवारी (दि.११) सातारा गावातील खंडोबा मंदिर गल्लीत दुपारी ४.५० वाजेच्या सुमारास मोकाट कुत्र्याने ६ जणांना कडाडून चावा घेत त्यांचे लचके तोडले. खंडोबा मंदिर गल्लीत मोकाट कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याचे कळताच मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल देवकर यांनी जखमींच्या घरी जाऊन कुटुंबाना धीर दिला. तसेच कुत्रे पकडण्यासाठी डॉग व्हॅनला बोलावून घेतले.
चिमुकल्याचा गाल फाडला
गावातील शुभम सुभाष निकम (२७), कार्तिक गणेश बोराडे (११), प्रेम रोहीदास खुटे (१६) या तीन तरुणांचा, तर मुलगी पुनम नवनाथ पळसकर (५), मुलगा मयूर विजय पळसकर (४) तेजस दिनेश राठोड (५) या तीन चिमुकल्यांचा अशा सहा जणांचे मोकाट कुत्र्याने लचके तोडून गंभीर जखमी केले. तेजस राठोड या चिमुकल्याचा कुत्र्याने गाल फाडला. या जखमीना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.