Stones pelted at Municipal Corporation team in Naregaon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिका नारेगावच्या रस्ता रुंदीकरणा आड येणाऱ्या मालमत्तांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत आहे. ऐनवेळी मार्किंग करून बुलडोझर चालवीत आहे. असे आरोप करीत जमावातून एकाने महापालिकेच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करीत जमावाला पांगविले. या घटनेनंतर अर्धा तास परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर तणावपूर्ण वातावरणातच पाडापाडी सुरू केली. यात सायंकाळपर्यंत २०० मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या.
महापालिकेने शहर विकास आर ाखड्यातील मंजूर सत्यांच्या रुंदीकरण-आड येणारी बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. मागील महिनाभरात प्रशासनाने बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, जळगाव रोड आणि जुना मुंबई रोड या पाच प्रमुख रस्त्यांवर मोहीम राबवून ४ हजारांहून अधिक विनापरवानगी बांधकाम केलेल्या मालमत्ता जमीनदोस्त केल्या. यात काही मालमत्ता या गुंठेवारी कायद्यानुसार नियमित केलेल्या होत्या.
तरीही पथकाने त्यावर कारवाई केली. मात्र, सेव्हनहिल जवळ पथक धडकताच महापालिकेचे बुलडोझर बंद पडले. यानंतर महापालिकेच्या पथकाने मोहिमेत दुजाभाव केला. गरिबांचीच घरे पाडली, असा आरोप झाला, त्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट, आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान, मंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने मार्किंग, सर्वेक्षण आणि कागदपत्रे तपासणीला सुरुवात केली. त्यासाठी १५ दिवस मोहीम बंद ठेवण्यात आली होती.
याच काळात महापालिकेने हसूल गाव आणि नारेगावामध्ये मंजूर रस्त्यासाठी सर्वेक्षण केले. परंतु, येथील मलमत्तांवर मार्किंगच केली नाही. त्यामुळे आपल्या मालमत्तेचा किती भाग या मोहिमेत बाधित होतो. तसेच बाधित होणाऱ्या जागेचा मोबदला आर्थिक स्वरुपात मिळणार की कसा, याबाबत कुठलीच माहिती न देता सोमवारी अचानक महापालिकेच्या पथकाने कारवाईचा निर्णय घेतला. सकाळी ९.३० वाजता मनपा आणि पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी गरवारे स्टेडियम येथे दाखल झाले, मोहिमेसाठी पथक तयार करून त्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर ११ वाजता पथक नारेगावच्या भवानी चौकात दाखल झाले. तेव्हा नागरिकांनी मार्किंगची मागणी करून पथकाला विरोध केला. परिस्थिती लक्षात घेत महापालिकने दुपारी २.३० वाजेपर्यंत मार्किंग केली. त्यानंतर पाडापाडीची मोहीम सुरू केली. काही वेळाचत जमावातून पथकावर दगडफेक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
तिघांकडे परवानगी
१० जणांकडे गुठेवारी नारेगाव ते सावंगी बायपासदरम्यान असलेल्या या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर २४२ मालमत्ता आहेत. त्यापैकी केवळ तिघांनीच परवानगी घेऊन आंधकाम केले आहे. तर १० जणांनी रीतसर गुंठेवारी केली आहे.
मार्किंगनंतर बाधित मालमत्ता काढून घेण्यासाठी वेळ देणार, असे महापालिका आयुक्तांनीच सांगितले होते. मात्र, पथकाने मार्किंग आणि पाडापाडी एकाच दिवसात केली. मार्किंगमध्येही घोळ केला, यापूर्वीच्या मार्किंगचे आमच्याकडे फोटो असे म्हणत माजी नगरसेवक गोकुळ मलके यांनी महापालिकेच्या कारवाईवर संशय व्यक्त केला.
महापालिकेने १५ दिवसांपूर्वीच या रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे कोणाच्या किती मालमत्ता बाधित होतात, हे सर्वांना माहीत होते. परंतु, त्यानंतरही मार्किंगची मागणी केल्याने दोन तासांत मार्किंग करण्यात आली. अनेकांनी स्वतः होऊन मालमत्तांची पाडापाडी केली आहे.- संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, महापालिका.