Crime News file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News: संतापजनक! सावत्र बापाकडून चिमुरडीवर अत्याचार; अंगावर चटके देऊन केला अमानुष छळ

Chhatrapati Sambhajinagar News: वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Crime News:

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ७ ते ९ वर्षे वयोगटातील चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरडाओरडीमुळे घटना उघडकीस

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरातून जोराने ओरडत असल्याचे शेजाऱ्यांनी ऐकले. संशय आल्याने नागरिकांनी तातडीने घराकडे धाव घेतली असता, चिमुरडीची अवस्था पाहून सर्वांचेच मन सुन्न झाले. मुलीच्या पाठीवर, हातावर आणि पायावर चटक्यांचे ८ ते १० वण दिसून आले. हा छळ आणि अत्याचार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे.

आईच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेजारील महिलांनी मुलीच्या आईवरही गंभीर आरोप केले आहेत. नराधम पतीला आईनेही या कृत्यात पाठिंबा दिला असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू

वाळूज पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून, पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी मुलीला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT