ST Bus : Buses built on old chassis
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षांपासून एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेला नवीन चेसिस उपलब्ध होत नसल्याने बस बांधणीचा डोलारा जुन्याच चेसिसवर आहे. या कार्यशाळेत २०२४ आणि २०२५ मधील तीन महिने अशा पंधरा महिन्यांत ६१५ बसची बांधणी करण्यात आली असल्याची माहिती मध्यवर्ती कार्यशाळा प्रमुख प्रमोद जगताप यांनी दिली.
या कार्यशाळेत अनेक वर्षांपासून नवीन चेसिस येणे बंद झाल्याने खराब झालेल्या बस परंतु त्यांची चेसिस कार्यरत राहणारी आहे. अशा बसच्या जुन्या चेसिसवर बस बांधणीचे काम सध्या सुरू आहे.
या कार्यशाळेत टाटा, लिलैंड व इतर चेसिसवर बस बांधणी करण्यात येत आहे. विभागातील खराब झालेल्या बस कार्यशाळेत आल्यानंतर त्यांच्या चेसिसची सर्व पातळीवर तपासणी करूनच त्यावर बस बांधणी करण्यात येत आहे. २०२४ या पूर्ण वर्षभरात जुन्या चेसिसवर ५३५ बसची बांधणी केली आहे. तर एप्रिल, मे आणि जून- २०२५ या तीन महिन्यांत ८० बस अशा पंधरा महिन्यांत ६१५ बसची बांधणी केली आहे.
या कार्यशाळेत दररोज १.१ इतक्या बसची बांधणी होते. दर महिन्याला २८ ते २९ बसची बांधणी येथील उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होते. वरिष्ठ कार्यालयाने ठरवून दिलेले उद्दिष्ट सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण करण्यात यश मिळत असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होताच बस बांधणीला वेग देण्यात आला आहे. एप्रिल, मे आणि जून-२०२५ या तीन महिन्यांत सुमारे ८० बस बांधल्या आहेत. यात एप्रिल-४५, मे-४२ तर जून महिन्यात ३७ बसची बांधणी करण्यात आली आहे.
विभागातील खराब झालेल्या शिवशाही बसचे रूपांतर हिरकणीत करण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच चार शिवशाही बसच्या जुन्या चेसिस उपलब्ध झाल्या असून, त्यातील चेसिसवर हिरकणी बसची बांधणी झाली आहे. काही किरकोळ कामे शिल्लक असून, त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत उतरणार असल्याचीही माहिती जगताप यांनी दिली.