

Income Tax Department conducts early morning raid on Asawa Brothers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आयकर विभागाकडून सोमवारी (दि.१४) भल्या पहाटे शहरातील असावा ब्रदर्सवर धाडी टाकण्यात आल्या. आयकर पथकाने एकाच वेळी सिडको एन-४ येथील असावा ब्रदर्स ज्युनिअर कॉलेज, कॉमर्स ॲकेडमी, सिडको एन-२, हर्मूल टी पॉइंटसह चार ठिकाणी धाडी टाकून पहाटेपासून झाडाझडती सुरू केली.
रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणीसत्र सुरू होते. या कारवाईमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कर चुकवेगिरी आणि टीडीएस रिफंडचे खोटे दावे दाखवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात आयकर विभागाकडून धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यासाठी सोमवारी देशभरात विविध राज्यांत आयकर विभागाने मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-४ येथील असावा ब्रदर्सचे ज्युनिअर कॉलेज, कॉमर्स अॅकॅडमी आणि सिडको एन-२ येथील घर आणि हर्मूल टी पॉइंटसह चार ठिकाणी आयकर विभाग पथकाकडून सोमवारी पहाटे ३ वाजता एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. अचानक आयकर पथक धडकल्याने असावा ब्रदर्ससह त्यांच्या कॉलेज व कार्यालयावरील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. पथकाकडून पहाटेपासून दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. सर्व ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हे तपासणीसत्र सुरू होते. यात काही कागदपत्रांसह अन्य महत्त्वाच्या दस्तावेजांची तपासणी पथकांकडून करण्यात आल्याचे समजते.
आयकर विभागाकडून या कारवाईसाठी जयपूर, पंजाबसह मुंबई आणि नाशिक येथील १७ हून अधिक वरिष्ठ आयकर अधिकारी शहरात धडकले. ८ ते ९ खासगी वाहनांमधून त्यांनी पहाटे एकाच वेळी असावा ब्रदर्सच्या कॉलेज, कॉमर्स अॅकॅडमी आणि घरावर छापे टाकले. या कारवाईबाबत मोठी गुप्तता बाळगल्याने आयकर पथकातील स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनाही याचा थांगपत्ता नव्हता.
असावा ब्रदर्स ज्युनिअर कॉलेज कॉमर्स अॅकॅडमीने विद्यार्थ्यांना गल्लेलठ्ठ शुल्क आकारून प्रवेश दिला आहे. सोमवारी नियमितपणे विद्यार्थी आले. मात्र कॉलेजवर आयकर विभागाचा छापा पडल्याने त्यांना माघारी पाठवले जात होते. यामुळे अॅकॅडमीचे विद्यार्थी तसेच पालकवर्गांमध्ये भीती निर्माण झाली आहे.