

Cooperative department raids house of moneylender woman
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरासमोर राहणाऱ्या खासगी सावकार महिलेकडून अडचणीच्या वेळी घेतलेल्या ७५ हजार रुपयांच्या बदल्यात पेन्शन खात्यातून २ लाख १० हजार आणि रोख दीड लाख दिले. मात्र त्यानंतरही व्याजाच्या सहा लाखांसाठी तगादा लावून घराची चावी न देणाऱ्या या सावकार महिलेच्या घरी सहकार विभागाने रविवारी सकाळी ७ वाजता धाड टाकली. घर झडतीमध्ये १० खरेदीखत व नोटरीखरेदी खत तपासकामी जप्त करण्यात आले.
यासंदर्भात सहकार विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार पुनाजी यमाजी जाधव रा. गल्ली नं.१२, संजयनगर, मुकुंदवाडी यांनी तक्रार दिली होती. ते सहकार खात्यातील सेवानिवृत कर्मचारी आहेत. त्यांचा मोठा मुलगा धनंजय हा अल्प दुष्टी असल्यामुळे त्यांनी घरासमोर राहणाऱ्या सावकार महिला कडूबाई विजय शिंदे यांच्याकडून ७५ हजार रुपये (मागील व्याज बाकी १० हजार नोव्हे. २०१८ मध्ये २० हजार, कोरोना बंदीमध्ये २० हजार, जुलै २१ मध्ये २० हजार, ऑगष्ट २०२१ मध्ये ५ हजार) घेतले होते.
यासाठी सावकार महिलेचा मुलगा अमोल विजय शिंदे याने धनंजय पुनाजी जाधव यांच्याकडून बॉन्डवर गहाणखत करायचे म्हणून नोटरीखरेदी खत करून घेतले. या सावकार महिलेला २९ जानेवारी २०२२ रोजी पेन्शन खात्यातून २ लाख १० हजार रुपये काढून दिले. २ फेब्रुवारी २०२२ रोजी दीड लाख रोखीने देण्यात आले.
तरीही सावकार महिलेने घराची किल्ली परत न देता व्याजाचे सहा लाख मागणी करीत असल्यामुळे कडूबाई विजय शिंदे व अमोल विजय शिंदे यांचे विरुध्द १७ मार्च २०२५ रोजी सहकार विभागाकडे लेखी तक्रार दिली.
त्यानुसार शहानिशा उपनिबंधक विलास कोळेकर यांनी विभागीय सहनिबंधक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी सुभाष राठोड यांच्या पथकाने सापळा रचून रविवारी सकाळी ७ वाजता सावकार कडूबाई शिंदे यांच्या घरी धाड टाकली. झाडाझडतीत १० खरेदीखत व नोटरीखरेदी खत जप्त करण्यात आले. पथकात सुषमा साबळे, आर. टी. टेकाळे, प्रवीण खंडागळे, राजू खरात व राहुल हिवर- ाळे हेड कॉन्स्टेबल, योगेश बावस्कर, ज्योती कांदे यांचा समावेश होता.