Agriculture News : सोयाबीन, मक्याचे सर्वाधिक नुकसान; बांधावर शेतकऱ्यांचा टाहो file photo
छत्रपती संभाजीनगर

Agriculture News : सोयाबीन, मक्याचे सर्वाधिक नुकसान; बांधावर शेतकऱ्यांचा टाहो

पावसाच्या खंडाचा पिकांना मोठा फटका; मंत्री अतुल सावे यांच्यासमोर अनेकांनी मांडल्या व्यथा

पुढारी वृत्तसेवा

Soybeans and corn suffered the most damage; farmers wail in despair at the edge of their fields

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पावसाने दड़ी मारल्याने उभ्या पिकांनी माना टाकल्या असून, वैजापूर तालुक्यात सोयाबीन, मका आणि कापसाची अवस्था दयनीय झाली आहे. हातातोंडाशी आलेली पिके सुकत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गुरुवारी (दि. २४) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. तेव्हा अनेक शेतकरी कुटुंबीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी व्यथा मांडत टाहो फोडला.

यावेळी जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, नगराध्यक्ष दिनेश परदेशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह काही अधिकारी उपस्थिती होती. जिल्ह्यात मागील ५० दिवसांपासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे खरीपाचे पिक संकटात सापडले आहे. या दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी गुरुवारी मंत्री सावे हे वैजापूर दौऱ्यावर होते.

त्यांनी येथील अनेक गावांतील शेतांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत पीकाची पाहणी केली. पावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक शेतांतील पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पिकांसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याची चिंता त्यांनी मंत्र्यांसमोर व्यक्त केली.

यावेळी सावे यांनी विविध गावांतील शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून पर्जन्यमान, पिकांची अवस्था पाणीटंचाई आणि संभाव्य नुकसान याबाबत माहिती घेतली. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर शासनाचे बारकाईने लक्ष असून, शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सावे यांनी सांगितले.

पाहणीदरम्यान मिळालेली वस्तुनिष्ठ माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्‍यांनी सांगितले.

मका, सोयाबीन, तुरीची पाहणी

मंत्री अतुल सावे यांनी वैजापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये बांधावर जाऊन पिकांची बारकाईने पाहणी करीत माहिती घेतली. त्यात वाघेरा, शिऊर बंगला येथे सोयाबीन, मका मोठ्याप्रमाणात बाधित झाल्याचे अढळले. तर तुरीचेदेखील नुकसान अधिकप्रमाणात झाले आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट

वैजापूर तालुक्यात गेल्या आठवड्यात औराळा गावातील रामकृष्णा वाघचौरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या मुलाला दत्तक घेत शिक्षणाची जबाबदारी घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT