

Municipal Corporation takes action against 18 defaulters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने शहरातील थकबाकीदारांविरोधात गुरुवारी (दि. २४) धडक मोहीम राबविली. विविध झोनमधील कर वसुली पथकांनी १८ मालमत्तांवर कारवाई करीत सुमारे २० लाख रुपयांची वसुली केली. काही मालमत्तांना सील ठोकण्यात आले, तर काहींकडून थकीत रकमेचे धनादेश घेण्यात आले. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
थकीत मालमत्ताकराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांनी सर्व झोन कार्यालयांतील कर वसुली पथकांना थकबाकीदारांच्या याद्या देत प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार गुरुवारी झोन १ च्या पथकाने दोन मालमत्तांवर कारवाई करून दोन लाख रुपये वसूल केले. झोन २ मध्ये तीन मालमत्तांवर कारवाई करीत दोन लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन ४ च्या पथकाने चार मालमत्तांना सील ठोकले. झोन ७ मध्ये तीन मालमत्तांवर सीलची कारवाई करून चार लाख रुपयांचे धनादेश स्वीकारण्यात आले.
झोन ९ च्या पथकाने चार मालमत्तांना सील ठोकून ५.२२ लाख रुपये, तर झोन १० च्या पथकाने दोन मालमत्तांना सील करून ६.९४ लाख रुपयांचा कर वसूल केला. दरम्यान, कर वसुली पथकांकडून थकबाकीदारांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत १३४ मालमत्तांवर सीलिंगची कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ताकराची संपूर्ण थकबाकी भरल्यानंतरच सील काढण्यात येईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले आहे.
विहित मुदतीत थकीत मालमत्ताकराचा भरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी विलंब न करता थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.