प्रातिनिधिक छायाचित्र (Pudhari Photo)
छत्रपती संभाजीनगर

Crime News : सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेपेची शिक्षा

पत्नीला माहेराहून सोबत घेऊन जाण्यावरून झालेल्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना

पुढारी वृत्तसेवा

Son-in-law sentenced to life imprisonment for murdering father-in-law

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पत्नीला माहेराहून सोबत घेऊन जाण्यावरून झालेल्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री औरंगपूर येथे घडली होती. या घटनेच्या १५ महिन्यांनंतर आरोपी जावई मनोज गुलाब गठोरसिंग (२९, रा. रेलगाव, ता. सिल्लोड) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर एन. सोनवणे यांनी जन्मठेप व ५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

आरोपीला ठोठावलेल्या दंडाच्या रकमेतून ४५०० रुपये मृताची मुलगी व आरोपीच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रकरणात मृत सुभाष रूपचंद भगोरे यांचा भाऊ गणेश रूपचंद भगोरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुभाष - भगोरे यांची मुलगी जयश्री हिचा विवाह घटनेच्या सहा वर्षांपूर्वी मनोज गठोरसिंग याच्याशी झाला होता.

संसारात वारंवार होणारे वाद, पतीकडून होणारा मानसिक त्रास आणि तो कोणताही रोजगार करत नसल्याने जयश्री दोन-तीन महिन्यांपासून माहेरी औरंगपूर (करमाड) - येथे राहत होती. पत्नीला परत नेण्यासाठी मनोज काही दिवसांपूर्वी सासरी आला होता. काही दिवस त्याने मंडप डेकोरेशनचे कामही केले; मात्र त्यानंतर - तो पुन्हा गावी गेला. १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री मनोज पुन्हा पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरी आला.

जयश्रीने नकार त्याच्यासोबत जाण्यास दिल्यानंतर त्याने सासरे सुभाष भगोरे यांच्यासह कुटुंबीयांना शिवीगाळ करत ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुभाष भगोरे यांनी त्यांचे बंधू गणेश भगोरे यांना तातडीने बोलावून घेतले. गणेश भगोरे यांच्यासमोर आरोपी मनोजने कमरेला लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढून सुभाष भगोरे यांच्या छातीत जोरदार वार केला.

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सुभाष भगोरे यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरात आरडाओरड सुरू होताच नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. हे पाहून आरोपी चाकूसह तेथून पसार झाला. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी तपास अधिकाऱ्यांसह ९ जणांची साक्ष तपासली. त्यात मृताची मुलगी व आरोपीच्या पत्नीची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी मनोज गठोरसिंग याला दोषी ठरवून बीएनएसच्या कलम १०३ (१) अन्वये जन्मठेप व ५ हजारांच्या दंडाची शिक्षा आणि कलम ३५१ (३) अन्वये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अॅड. देशपांडे यांना अॅड. आसावरी जोशी व अॅड. दामिनी थोटे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT