

Path cleared for employee promotions at Sambhajinagar Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे. सफाई कामगारांची १३५ पदे कमी करून 'मुकादम' या नवीन पदनामाची १३५ पदे निर्माण करण्यास नगर विकास विभागाने अंतिम मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने २७ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे 'मुकादम' या पदासोबतच स्वच्छता निरीक्षक, क्रीडा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, मेकॅनिकल, विद्युत) आणि उद्यान सहायक अशा विविध संवर्गातील सेवा प्रवेश व पदोन्नतीचे नियम सुधारित करण्यात आले आहेत.
शासनाच्या नवीन नियमानुसार 'मुकादम' हे गट-डमधील पद १०० टक्के पदोन्नतीने भरले जाणार आहे. मनपाच्या सफाई कामगार/स्वीपर संवर्गातील किमान ५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या आणि किमान एसएससी (१० वी) परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे मुकादम पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
५० टक्के पदे सरळसेवेने आणि ५० टक्के पदे मनपातील गट-क व गट-डमधील अर्हताधारक कर्मचाऱ्यांमधून 'मर्यादित विभागीय परीक्षे' द्वारे भरली जातील. क्रीडा अधिकारी हे पद पदोन्नतीने सहायक क्रीडा अधिकाऱ्यांमधून (३ वर्षांचा अनुभव) भरले जाईल. पदोन्नतीसाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास राज्य शासनाच्या क्रीडा विभागातून किंवा इतर मनपामधून प्रतिनियुक्ती/समायोजनाद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. उद्यान/कृषी सहायक या पदांच्या ७५ टक्के जागा सरळसेवेने तर २५ टक्के जागा पदोन्नतीने भरल्या जातील. मनपातील प्रमुख माळी (३ वर्षांची सेवा) किंवा माळी (१० वर्षांची सेवा) असणाऱ्या आणि व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळेल.
कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, मेकॅनिकल आणि विद्युत) या पदांच्या ७५ टक्के जागा सरळसेवेने तर २५ टक्के जागा पदोन्नतीने भरल्या जातील. या पदावर नियुक्ती किंवा पदोन्नती मिळाल्यानंतर संबंधित अभियंत्यांना शासनाने विहित केलेल्या संस्थेकडून घेतली जाणारी 'कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा' पहिल्या ३ प्रयत्नांत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.