Crime News : भावाच्या परस्पर बहिणींनी दीड कोटीची संपत्ती लाटली File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : भावाच्या परस्पर बहिणींनी दीड कोटीची संपत्ती लाटली

आईच्या बँक खात्यातील रकमा, शेअर्स हडपले

पुढारी वृत्तसेवा

Sisters cheated their brother and embezzled Rs 1.5 crore worth of property

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आईच्या नावावर असलेले बँक मुदत ठेवीचे पैसे, डी-मॅट खात्यातील शेअर्स आणि प्लॉट विक्रीतून आलेली सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम दोन सख्ख्या बहिणींनी भावाच्या परस्पर संगनमताने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६४ वर्षीय व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात रविवारी (दि.२२) दोन्ही बहिणींविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सुनील कुमार हरिकिशन कलाणी (६४, रा. बीड बायपास) हे मूळचे पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील हरीकिशन कलाणी यांचे २०२० मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी वडिलांनी एक वसीयतनामा (मृत्युपत्र) केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता मुलगा सुनील कुमार यांच्या नावे केली होती. वडिलांच्या सांगण्यावरून सुनील कुमार हे त्यांच्या आईला (विमलादेवी) दरमहा ७५ हजार रुपये औषधोपचारासाठी पाठवत असत.

तक्रारीनुसार, सुनील कुमार यांच्या दोन बहिणी सुनीता दिलीप लाहोटी (रा. कोलकाता) आणि शोभना शरद टुवानी (रा. जयपूर) यांनी आईला विश्वासात घेऊन जयपूरला नेले. आईची प्रकृती खालावलेली असताना, या दोघींनी संगनमताने आईच्या बँक खात्यांवर आणि डी-मॅट खात्यावर सुनील कुमार यांचे नाव नॉमिनी म्हणून असताना बहिणींनी आईच्या बनावट स्वाक्षऱ्या घेऊन स्वतःची नावे लावून घेतली. आईच्या निधनानंतर (२० मार्च २०२४) बहिणींनी डी-मॅट खात्यातील सुमारे ८० लाख रुपयांचे शेअर्स स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले. सिलीगुडी, कोलकाता आणि पंजाब नॅशनल बँकेतील विविध खात्यांमधून अंदाजे ६५ ते ७० लाख रुपये काढून घेऊन काही खाती बेकायदेशीरपणे बंद केली.

जयपूर येथील सुशांत सिटीमधील एक प्लॉट आईच्या हयातीतच कोऱ्या कागदावर सह्या घेऊन अंदाजे ३५ लाख रुपयांना विकला आणि त्याचे पैसेही हडप केले. आईच्या निधनानंतर जेव्हा सुनील कुमार यांनी बँक स्टेटमेंट तपासले, तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला.

आईने मृत्यूपूर्वी (१५ फेब्रुवारी २०२४) केलेल्या वसीयतनाम्यातही सर्व संपत्ती सुनील कुमार यांना देण्याचे नमूद केले होते. मात्र दोन्ही बहिणींनी मिळून एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT