सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्याबाई कर्जमाफी योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याला सर्वाधिक मदतीचा निधी मिळाला आहे. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील एकूण ५,७८१ शेतकऱ्यांसाठी २८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोड तालुक्यातील ४,९८२ शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ४५ लाख ७३ हजार १६१ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये १७ कोटी ६९ लाख ५९ हजार ४६७ रुपये मुद्दलाची, तर ५ कोटी ७६ लाख १३ हजार ६९४ रुपये व्याजाची रक्कम आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना तसेच सर्वाधिक निधीचा लाभ सिल्लोड तालुक्याला मिळाला आहे.
सोयगाव तालुक्यातील ७९९ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९४ लाख ६६ हजार ८२८ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये ३ कोटी ५६ लाख ५४ हजार ५९७ रुपये मुद्दलाची, तर १ कोटी ३८ लाख १२ हजार २३१ रुपये व्याजाची रक्कम आहे.
सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील एकूण ५,७८१ शेतकऱ्यांना २८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या शेतकरी हिताच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.