अवैध वाळूचा पकडलेला सोळा चाकी एलपी ट्रकसोबत तहसीलदार सागर वाघमारे, मंडळ अधिकारी काशीनाथ ताठे, विशाल पाटील.  (छाया : राजू वैष्णव)
छत्रपती संभाजीनगर

Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतुकीच्या नवीन पॅटर्नचा पर्दाफाश

दोन ट्रक आणि हायवा पकडला; १ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : ताडपत्रीने झाकून सोळा चाकी एलपी ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक करण्याचा नवीन प्रकार महसूल विभागाने उघडकीस आणला. शनिवारी (दि. २८) पहाटे निल्लोड फाटा येथे दोन एलपी ट्रक, तर सकाळी पानस फाट्याजवळ एक हायवा पकडण्यात आला. या दोन स्वतंत्र कारवायांत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खान्देशातील गिरणा नदीतून छत्रपती संभाजीनगरकडे सोळा चाकी ट्रकमधून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सागर वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील निल्लोड फाटा येथे सापळा रचला. यावेळी ताडपत्रीने झाकलेले एमएच २० जीझेड ७८६० आणि एमएच २० जीझेड ३०८६ क्रमांकाचे दोन ट्रक येताना दिसले.

पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. दोन्ही वाहने जप्त करण्यात आली. यानंतर सकाळी आठच्या सुमारास पानस फाट्याजवळ आणखी एका हायवावर कारवाई करण्यात आली. हा हायवा भोकरदन तालुक्यातील असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

पकडण्यात आलेल्या तिन्ही वाहनांतील वाळूचा घाट लिलाव झालेला नसल्याने वाहनचालकांकडे रॉयल्टीच्या पावत्या नव्हत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. एलपी ट्रकचे मालक अशपाक पटेल आणि गुड्डू शेख (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), तसेच हायवा मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.

चालक शेख इम्रान आणि कदिर खान यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. ही कारवाई तहसीलदार सागर वाघमारे, मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे, ग्राम महसूल अधिकारी विशाल दुनगहू, किरण तायडे, कृष्णा पायगव्हाण आणि महसूल सेवक नबी शहा यांच्या पथकाने केली.

कारवाईचा धडाका सुरूच

तहसीलदार सागर वाघमारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. आतापर्यंत दोन एलपी ट्रक, पाच हायवा आणि ११ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यांत एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसतानाही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. महसूल विभागाच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे वाळू तस्करांवर कारवाईचा दबाव वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT