Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Crime News : अंधारीच्या डॉक्टर मृत्यूप्रकरणी एक ताब्यात; एक संशयित फरार

डॉ. तायडे १९ जून रोजी अंधारी येथून दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यानंतर २० जूनच्या पहाटे ते बनकिन्होळ्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अंधारी येथील डॉ. बाळासाहेब भिकन तायडे (४५) यांच्या मृत्यू प्रकरणी वडोदबाजार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ३) एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसरा संशयित फरार आहे. डॉ. तायडे हे २० जूनच्या पहाटे छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील बनकिन्होळा येथील शनिमंदिराजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. २) रात्री त्यांचा मृत्यू झाला.

शिवाजी पंढरीनाथ चोरमारे (वय ३६, रा. पीरसांवगी, ता. बदनापूर, जि. जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तायडे १९ जून रोजी अंधारी येथून दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यानंतर २० जूनच्या पहाटे ते बनकिन्होळ्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला या प्रकरणी २६ जून रोजी अपघाताची नोंद करण्यात आली होती.

मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी वैशाली तायडे यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत तक्रार दिली. त्यानुसार वडोदबाजार पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, बीट जमादार धनराज खाकरे यांच्या पथकाने तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

तपासादरम्यान १९ जून रोजी दुपारपासून रात्री दीड वाजेपर्यंत डॉ. तायडे हे दोन व्यक्तींसह भराडी येथील एका पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्हीत दिसून आले. तसेच त्यांनी आपली दुचाकी फुलंब्री तालुक्यातील आळंद-अंधारी फाट्यावरील एका हॉटेलजवळ उभी करून पांढऱ्या रंगाच्या कारमधून पुढे गेल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

घातपाताचा संशय ठरला खरा

डॉ. तायडे ज्या परिस्थितीत आढळून आले होते, त्यावरून नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पोलिस तपासही त्याच दिशेने सुरू होता. आता एक संशयित ताब्यात आल्यानंतर हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा उलगडा तपासातून होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT