

विशाळगड : परळे निनाई गावापासून दूर, कडवी धरणाच्या निर्जन परिसरात राहणार्या कंक दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण शाहूवाडी तालुका हादरला आहे. या वृद्धांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला की घातपातामुळे झाला यावरून पोलिस आणि वन विभाग यांच्यामध्ये परस्परविरोधी मते आहेत. त्यामुळे या दोन प्रमुख यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
निनू यशवंत कंक आणि त्यांच्या पत्नी रखुबाई कंक हे गोलीवणे वस्तीपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर, धरणाच्या काठावर एका झोपडीत राहत होते. शनिवारी त्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. त्यांचा मुलगा सुरेश कंक यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मात्र, तेव्हापासून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले आहेत. पोलिस आणि वन विभाग यांच्याकडून या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूच्या कारणाचा प्राथमिक अंदाज वर्तविताना परस्परविरोधी मते समोर येत आहेत.
या परस्परविरोधी भूमिकांमुळे तपास भरकटण्याची भीती व्यक्त होत आहे. नुकसानभरपाई आणि तपासाची जबाबदारी एकमेकांवर ढकलून दोन्ही खाती वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. दोन्ही मृतदेहांचे कोल्हापूर येथे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल निर्णायक ठरणार आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. झोपडीपासून जवळच असलेल्या एका फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले जात आहे, मात्र अद्याप त्यात काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून येणारा अहवालच या प्रकरणाचे गूढ उकलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मृत रखुबाई यांच्या मानेवर आणि चेहर्यावर झालेल्या जखमा पाहता, हा जंगली प्राण्याचा हल्ला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर हा पोलिसांचा अंदाज फेटाळला आहे. घटनास्थळी कोणत्याही वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे किंवा इतर खुणा आढळल्या नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.