छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून दोन पर्यटक महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.११) सायंकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान घडली. रेखा हरीभाऊ गायकवाड (वय ६५, गजानननगर, टीव्ही सेंटर हडको), स्वाती अमोल खैरनार (वय ३७, चाळीसगाव) या अशी मृत महिलांची नावे आहेत. दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोन वर्षापूर्वी प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे हे छत कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिद्धार्थ उद्यानासमोर भागात बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्त्वावर १५ वर्षांपासून शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी दोन वर्षांपूर्वी महापालिकेने भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. हे काम बीओटीच्या कंत्राटदारामार्फतच करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून त्यावेळी हे बांधकाम करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर गर्दी होती. यादरम्यान जोरदार वारा सुटल्याने या प्रवेशद्वाराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चार ते पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले.