Shri Girijadevi Navratri festival attracts everyone, temple at Mhaismal
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील म्हैसमाळ येथील जागृत दैवस्थान म्हैसमाळच्या श्री गिरिजादेवी नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन गिरिजादेवी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरपासून ३५ किलोमीटर अंतरावर तर खुलताबाद येथून ११ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून ९१३ मीटर्स उंचीवर असलेले मराठवाड्याचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र म्हैसमाळ येथील श्री गिरीजामाता देवीचे प्रसिद्ध जागृतस्थान आहे. येथे दरवर्षी नवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो. देवस्थानच्या अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्या हस्ते घटस्थापना करून विधिवत पूजाअर्चा, नैवैद्य, महाआरती केली जाते. दररोज सकाळी, संध्याकाळी सनई-चौघडा वाजविला जातो.
अखंड नंदादीप लावला जातो. अष्टमीला होमहवन केला जातो. विजयादशमीला शमीपूजन, सीमोल्लंघन होते. नवरात्र- ोत्सवानिमित्त भक्तांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या श्री गिरिजादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण गर्दी करतात. कोणी पर्वताच्या पायथ्यापासून दंडवत करीत आपले नवस फेडतात तर कोणी तासनतास रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतात.
म्हैसमाळ धार्मिकदृष्ट्या जसे प्रसिध्द आहे तसे मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे. नवरात्रोत्सव दरवर्षी श्री गिरिजादेवी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. घटस्थापना करून देवीची विधिवत पूज-अर्चा करून नैवैद्य, आरती केली जाते. अखंड नंदादीप लावला जातो. अष्टमीला होमहवन केले जाते. देवीच्या मंदिरात मोठा चौघडा आहे. तो दिवसातून चार वेळा वाजविला जातो. मंगलमय सनईचा सूर आणि चौघड्यांच्या आवाजाने मंदिर परिसर दुमदुमून जातो. श्री गिरिजादेवी मंदिराचा गाभारा पहाटे पाच वाजता उघडला जातो व रात्री बाराच्या सुमारास बंद केला जातो.
नवरात्र उत्सव काळातील विविध धार्मिक कार्यक्रमासाठी श्री देवी गिरिजा मातेच्या दर्शनार्थ येऊन मातेचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री गिरीजादेवी संस्थान म्हैसमाळ तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ, पुजारी व विश्वस्त मनोहर भारती, पुजारी नंदू भारती, पुजारी राजू भारती, मंडळाधिकारी विजय चव्हाण, तलाठी बंडू आव्हाड, तलाठी नितीन गायकवाड, व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव, लिपिक विठ्ठल भारती यांनी केले.
गिरिजादेवी संस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार नवरात्र महोत्सव निमित्त सोमवारी (दि. २२) सकाळी १० वा. घटस्थापना, रविवारी (दि. २८) सकाळी १० वा. भंडारा, ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वा. होमहवन, १ ऑक्टोबरला सकाळी ७वा. महाभिषेक व महाप्रसाद, २ ऑक्टोबर रोजी सायं. ७ वा. शमीपूजन, सीमोल्लंघन (दसरा) आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.