

मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्यातील पोलाद उत्पादनात आतापर्यंत ८१ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरात 'अथा ग्रुप' साडे पाच हजार कोटींची गुंतवणुक करणार असून त्यातून थेट पाच हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. या एकूण गुंतवणुकीतून राज्यात सुमारे ४० हजार ३०० रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने यासाठी ९ कंपन्यांशी सामंजस्य करार केला असून, हरित पोलादनिर्मितीच्या क्षेत्रातही महाराष्ट्राला देशाचे सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
मुंबईत 'आयफा स्टीलेक्स २०२५' या स्टील महाकुंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि ९ कंपन्यांमध्ये ८० हजार ९६२ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे ४० हजार ३०० रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
२०३० पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण ऊर्जेतील ५८ टक्के वीज ही अक्षय ऊर्जेतून येणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे सौरऊर्जेचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे वीज दरांवरील अनुदानाचा भार कमी होणार असून, उद्योगांसाठी वीज दर पुढील पाच वर्षे दरवर्षी कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत सुमारे ८१ हजार कोटींचे गुंतवणूक प्रकल्प पोलाद क्षेत्रात आले असून, पुढील काळात महाराष्ट्र देशात पोलाद उत्पादनात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गडचिरोलीत जल, जमीन, जंगल नष्ट न करता पोलादनिर्मितीची नवी इको-सिस्टीम उभारणार आहोत. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया, गॅस व्हॅल्यू चेन आणि बॅटरी स्टोअरेज यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोलीत उद्योग विभागाने एमआयडीसीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यातील अडचणी दूर केल्या आहेत. या भागातील भूसंपादनासाठी आवश्यकतेनुसार अधिकारी उपलब्ध करून देण्यात येतील. मात्र, ठरलेल्या कालावधीत उद्योग उभारून रोजगार वाढवावे, असे आवाहनही उद्योगमंत्री सामंत यांनी उपस्थित उद्योजकांना केले.