

Japanushthan ceremony at Bhangshimata Fort on the occasion of Navratri festival
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवानिमित्त शरणापूर येथील भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वामी परमानंदगिरी महाराज आश्रमात २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान भव्य जपानुष्ठान व नवचंडी यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सोमवार पासून दररोज सकाळी साडेपाच वाजता नित्यनियम विधी, आरती, सायंकाळी ७ वाजता श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांचे प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता नवचंडी यज्ञ, दुपारी साडेबारा वाजता श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या प्रवचनानंतर महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
स्वामी परमानंदगिरी महाराज यांनी प्राचीन वारसा लाभलेल्या भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी गोशाळा, गुरुकुल, भव्य ध्यानमंदिर, कुटीया तसेच लाल दगडात भव्य असे पशुपतयेश्वर महादेव मंदिर बांधण्यात आले आहे.
याच बरोबर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी टेकडी ग्रुपच्या माध्यमातून गेल्या चार-पाच वर्षात याठिकाणी शेकडो झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. यामुळे गडाचा परिसर निसर्ग संपन्न बनला आहे. ग्रुप मधील सदस्य आपले व कुटुंबीयांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस भांगाशी माता गडावर वृक्षरोपण करून साजरे करतात. शिवाय निसर्ग रम्य तसेच पर्यटन स्थळ म्हणुनही अनेकजण या गडाला भेट देत असतात.
छत्रपती सांभाजीनगरपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या भांगशीमाता गडाच्या शिखरावरील गाभाऱ्यात भांगशी मातेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराजवळच जमिनीपासून जवळपास ८०० फूट उंचीवर सासू-सुनेचे कुंड असून या कोरीव कुंडात बाराही महिणे पाणी उपलब्ध असते. नवरात्र उत्सवात भांगशी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने गडाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.