Satyeshwar-Shiva-Parvati Temple : शिव-पार्वती समोरासमोर असलेले मंदिर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Satyeshwar-Shiva-Parvati Temple : शिव-पार्वती समोरासमोर असलेले मंदिर

श्रावण सोमवार विशेष : भावसिंगपुऱ्यातील सत्येश्वर महादेव मंदिराला चारशे वर्षांचा इतिहास

पुढारी वृत्तसेवा

Shravan Somvar Satyeshwar-Shiva-Parvati Temple

भाग्यश्री जगताप

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्राचीन असे महादेव मंदिर आहे जे ऐतिहासिक आहे. ते मंदिर म्हणजे भावसिंगपुरा परिसरात असलेले चारशे वर्षे जुने असे सत्येश्वर-शिव-पार्वती मंदिर. याठिकाणी ऐतिहासिक बारव आहे. ज्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. महादेव आणि पार्वतीचे एकाच ठिकाणी आणि तेही विहिरीत असलेले हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर असल्याचे सांगितले जाते.

प्रत्येक मंदिरात शिव-पार्वती शेजारी शेजारी असतात. परंतु छत्रपती संभाजीनगर शहरातील भावसिंगपुरा परिसरातील श्री सत्येश्वर शिवपार्वती मंदीरात शिव आणि पार्वतीविरुद्ध दिशेला, वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान आहेत. ४०० वर्षे जुने हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, श्रावणात येथे महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते.

महाशिवरात्रीला महादेव-पार्वती यांच्या विवाहाची परंपरा

मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. श्रावणी सोमवारी येथे यात्रेचे स्वरूप येते. महाशिवरात्रीला मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. दिवसभर ओम नमः शिवायचा जप चालतो. तर महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक करून रात्रभर धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव-पार्वतीचा थाटात विवाह लावला जातो. यासाठी दोन्ही बाजूंचे वराती येथे येतात. खऱ्याखुऱ्या विवाहासारखाच हा विवाह संपन्न होतो.

प्रत्येक महाशिवरात्रीला महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. ही जुनी परंपरा भावसिंगपुऱ्यातील नागरिक आजही मोठ्या श्रद्धेने जपतात. हळदही लावली जाते. महाशिवरात्रीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते, जशी लग्नघटिका जवळ येते, तशी दोन्ही बाजूंच्या वऱ्हाडींची लगबग सुरू होते. वर महादेव व वधू पार्वती यांचा शृंगार करतात. मंगलाष्टकांचे सूर आणि मध्यरात्री बाराच्या ठोक्याला सनई-चौघड्यांच्या निनादात वधू-वरांच्या अंगावर अक्षता पडतात. तसेच ढोल-ताशांच्या गजरात विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो.

भावसिंगराजा यांच्याकाळातील मंदिर

भावसिंगपुरा भागातील सत्येश्वर महादेव मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास असल्याचे इतिहासतज्ज्ञ सांगतात. भावसिंगराजा यांच्याकाळातील हे मंदिर आहे. त्यांच्या नावावरूनच या परिसराचे नाव भावसिंगपुरा पडले. हे मंदिर जमिनीपासून २५ ते ३० फूट खाली आहे. मंदिरापर्यंत २५ ते ३० पायऱ्या आहेत. तर मंदिरापासून ते पाण्यापर्यंत ५० पायऱ्या आहेत. तसेच बारव ६० फूट खाली आहे. तर ३० फूट मंदिर आहे. मंदिराची पडझड काही ठिकाणी झाली होती. त्याचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे, असे प्रमोद लोखंडे यांनी सांगितले.

श्रावणात दर्शनासाठी गर्दी

अनेकदा महादेवाच्या मंदिरात शंकर-पार्वती शेजारी असतात. परंतु या ठिकाणी असलेल्या मंदिरात महादेवाच्या अगदीविरुद्ध दिशेला पार्वती देवी उभी आहे. शिव आणि पार्वती असे समोरासमोर अस-लेले हे शहरातील एकमेव मंदिर आहे. भगवान महादेव पश्चिममुखी आहे तर पूर्वमुखी पार्वतीचे मंदिर आहे. श्रावणात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही पायऱ्या आहेत. त्या उतरल्यावर शिव आणि पार्वतीची समोरासमोर मंदिरे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT