

Discharge from Jayakwadi at any moment, 83 percent water storage in the dam
पैठण, पुढारी वृत्तसेवा :
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत कुठल्याही वेळात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची वेळ येणार असल्याने खबरदारीचा उपाय करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.
गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण, जुने कावसान, चनकवाडी, पाटेगाव, वडवळी, नायगाव, मायगाव, कुराणपिंपरी, आ पेगाव, नवगाव, तुळजापूर, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी येथील शेतकरी, नागरिकांनी गोदावरी नदीत विद्युत मोटर, पाळीव प्राणी, शेतीसाहित्य इत्यादी वस्तूंची खबरदारी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, पंचायत समिती ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील यांनी आपापल्या विभागात नागरिक शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रवाहात उतरू न देण्याच्या सूचना करण्याचे पत्र महसूल, नगरपरिषद, कृषी, पोलिस विभागाच्या विभाग प्रमुखांना दिले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरी नदीतील शेती साहित्य व सामग्री काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे.
दरम्यान, पैठण येथील नाथसागर धरणाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने रविवारी (दि. २७) रात्री नऊ वाजेपर्यंत धरण नियंत्रण कक्षात ८३.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. वरील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्यास ९५ टक्के च्या जवळपास पाणीसाठा उपलब्ध झाल्यास गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग करण्याच्या नियोजनासाठी लवकरच जलपूजन करण्यात येणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नाथसागर धरणाच्या वरील भागात सतत पाऊस पडत असल्याने येथील धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दर तासाला वाढली आहे. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत १८ हजार १०३ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. यामुळे धरणात उपलब्ध झालेल्या पाण्याची ८३.१० टक्केवारी नोंद करण्यात आल्याची माहिती धरण उप अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
पैठण येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या प्रशासकीय नियोजनानुसार धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यापूर्वी महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी आपापल्या परिसरातील शेतकरी नागरिकांना सूचना करण्यासाठी संबंधित गावाचे महसूल अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक यांची लवकरच बैठक घेऊन आदेश देण्यात येणार आहे. नागरिक व शेतकरी यांनीकुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी केले.