Jyotirling in Marathwada: मराठवाड्यात तीन ज्योतिर्लिंग; औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर मंदिराच्या वेळा, नियमावली काय, कसे पोहोचाल?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्‍वर, हिंगोलीत औंढा नागनाथ व बीडच्या परळीतील वैद्यनाथाचे मंदिर हे शिवभक्‍तांसाठी श्रावणमासात पर्वणीचे ठरतात.
Jyotirling in Marathwada
Jyotirling in Marathwada: मराठवाड्यात तीन ज्योतिर्लिंग; औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर मंदिराच्या वेळा, नियमावली काय, कसे पोहोचाल?File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्‍वर, हिंगोलीत औंढा नागनाथ व बीडच्या परळीतील वैद्यनाथाचे मंदिर हे शिवभक्‍तांसाठी श्रावणमासात पर्वणीचे ठरतात. महाराष्ट्रात बारापैकी पाच ज्योतिर्लिंग असून, त्यातील तीन मराठवाड्यात आहेत. या मंदिराच्या वेळा काय, मंदिराची नियमावली, कसे पोहोचाल हे जाणून घ्या...

घृष्णेश्वर मंदिर

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखल्या जातो. श्रावणी सोमवारला असणार्‍या धार्मिक महत्त्वामुळे शिवालये गजबजलेली असतात. छत्रपती संभाजीनगरपासून 30 किमी अंतरावर असणार्‍या वेरूळच्या घृष्णेश्‍वर मंदिराचा उल्‍लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारताती आढळतो. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम केला. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी पुन्हा मंदिराची पुनर्बांधणी केली. लाल रंगाच्या दगडांचा वापर, शिखरावर नक्षीकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य असून, शिवलिंगाची स्वयंभू पिंड ही गर्भगृहात आहे. मंदिराजवळ शिवालय तीर्थ असून, 56 पायर्‍या आहेत.

परळीचा वैजनाथ

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् .. या ज्योतिर्लिंग स्त्रोत्रात बीड जिल्ह्यातील परळीचा उल्‍लेख प्रारंभीच आहे. यादवांच्या काळात श्रीकरणाधीप हेमाद्री याने मंदिराची उभारणी केल्यानंतर अहिल्यादेवींंनी आपल्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार केला. आकर्षक लांब पायर्‍या, आकर्षक प्रवेशव्दार, सभामंडप व गाभारा समपातळीवर असल्याने दर्शनास सोपे असणारे वैजनाथाचे मंदिर आहे. हेमाडपंथी आणि आकर्षक शैलीकाम असणार्‍या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. परभणी- लातूर रेल्वे मार्गावर परळी वैजनाथ असून, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी आदी ठिकाणांहून बसगाड्या आहेत. वैद्यांचा स्वामी अशी भावना असल्यामुळे परळीच्या महादेव पिंडिला स्पर्श केल्यास रोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

औंढ्याला पांडवकालीन संदर्भ

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगचा संदर्भ थेट पांडवकालीन आहे. पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात मंदिर बांधल्याचे म्हटले जाते. अर्थात पुढे यादवकाळात मंदिराची बांधणी झाली. चुना न वापरता केवळ खाचा करून मंदिर बांधले असून, हेमाडपंथी शैलीचे काम आहे. मंदिरावर आकर्षक असे कोरीव काम असून, महादेवाची पिंड गाभार्‍यात आहे. इतर दोन ज्योतिर्लिंगाप्रमाणेच या मंदिराचीही नव्याने उभारणी अहिल्यादेवींनी केल्याचे मानले जाते. संत नामदेव कीर्तन करत असताना तत्कालीन पुजार्‍यांनी त्यांना अडवले व मंदिराच्या मागील बाजूस ढकलले. नामदेवांनी अत्यंत भक्तिभावाने पांडुरंगाचा धावा केला तेव्हा संपूर्ण मंदिर फिरले आणि महाद्वार नामदेवांच्या दिशेने आले, अशी आख्यायिका आहे. यामुळे औंढ्याला वारकरी जगतातही मानाचे स्थान आहे.

कसे जाणार ? कुठे उतरणार ?

1. वेरूळला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून एसटी बसगाड्या, खासगी वाहने मिळू शकतात. धुळ्याकडे जाणार्‍या बसगाड्या वेरूळला थांबतात. वेरूळ परिसरात हॉटेल्स, रिसॉर्ट असल्यामुळे उतरण्याची फारशी अडचण नाही. परंतु संभाजीनगरपासून जवळ असल्याने भाविकांना एका दिवसात वेरूळचे मंदिर, लेण्यांचे दर्शन घेणे शक्य आहे.

2. परळी हे रेल्वे आणि रस्ते मार्गावरील महत्त्वाचे तालुकास्थान आहे. परळीतही हॉटेल, लॉज, शासकीय विश्रामगृह आणि भक्‍तनिवास आहे. हैदराबाद, निझामाबाद, परभणी, नांदेड, संभाजीनगर, बिदर, नागपूर, धनबाद आदी ठिकाणी जाणार्‍या रेल्वे तपरळीहून जात असल्याने रेल्वे मार्ग सोयीचा आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या ठिकाणांहून बसगाड्यांची व्यवस्था आहे.

3. हिंगोलीहून औंढा नागनाथ 30 किमी अंतरावर आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीला रेल्वेने उतरल्यास तेथून बस, खासगी वाहनाने औंढ्याला जाता येते. एमटीडीसी, भक्‍त निवास, हॉटेल्सची व्यवस्था असली तर हिंगोली, परभणी, नांदेड येथे थांबण्यास भाविक प्राधान्य देतात.

श्रावण महिन्यातील मंदिराच्या वेळा

औंढा नागनाथ मंदिरातील दर्शनाची वेळ : पहाटे चार ते रात्री 9 वाजेपर्यंत. श्रावणात ही वेळ दहा वाजेपर्यंत असते.

परळी मंदिरातील दर्शनाची वेळ : पहाटे पाच ते रात्री साडेदहा. श्रावण सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत मंदिरात भाविकांना प्रवेश मिळतो.

वेरूळमधील घृष्णेश्‍वर मंदिरातील दर्शनाची वेळ : पहाटे साडेपाच ते 9 आहे. श्रावण महिन्यात पहाटे तीन ते रात्री अकरा अशी आहे.

मोबाईलवर निर्बंध

वेरूळ येथे दर्शनासाठी शर्ट, चामडी पट्टा काढावा लागतो. मोबाईल मंदिरात नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे मंदिराबाहेर अनेक विक्रेत्यांनी मोबाईल ठेवण्यासाठी शुल्कावर आधारित व्यवस्था केली आहे.

परळीत अभिषेक करावयाचा असल्यास शर्ट घातलेल्यांना परवानगी नाही. औंढा, परळीतही सर्वसाधारणपणे मोबाईल नेण्यास प्रतिबंध आहे. भारतीय संस्कृतीशी पूरक असा ड्रेसकोड असावा, अशी या मंदिरांच्या विश्‍वस्तांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news