Shivajinagar subway will remain closed during Diwali festival
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहरातील शिव-ाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गावर पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता, गटप्रकल्प विभाग (मजीप्रा), छत्रपती संभाजीनगर यांनी या ठिकाणी सुमारे ५२ मीटर लांबीच्या पाईपलाइन टाकण्याचे नियोजन केले असून, हे काम १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे.
कामाच्या कालावधीत जर पावसाचे वातावरण निर्माण झाले तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शिवाजीनगर चौक ते देवळाई चौक दरम्यानच्या भुयारी मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात येणार आहे. या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भुयारी मार्ग बंद असताना वाहतूक खालील पर्यायी मार्गान वळविण्यात येईल. देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डाणपूल, एम.आय.टी. चौक, महानुभव आश्रम चौक, रेल्वे स्टेशन तसेच शहानूरमियों दर्गा चौक मार्गे वाहने ये-जा करतील. तसेच शिवाजीनगर, धरतीधन सोसायटी, गादिया विहार मार्गे जाणाऱ्या वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अधिसूचनेत रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम ३३(१) (ब) आणि मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ नुसार अधिसूचना जारी केली आहे.