Shiv Sena wins in Vaijapur panchyat samiti
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वैजापूर तालुक्यात शिवसेनेने पंचायत समितीच्या सोळा पैकी सात जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार, भारतीय जनता पक्षाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला.
जिल्हा परिषदेच्या आठ जागापैकी शिवसेनेने तीन, शिव सेना (उबाठा) पक्षाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने व अपक्ष यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांनी सर्व निकाल घोषित केले.
सोळा टेबलवर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने घायगाव, लासूरगाव, पालखेड, संवंदगाव, जरूळ, बोरसर व मनूर या सात गणांत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वीरगाव, वांजरगाव, लाडगाव व वाकला या गणांत विजय मिळवला.राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने शिऊर गणांत सोनाली किशोर जाधव या उमेदवाराला विजय मिळवून दिला.
त्यांना ३५१५ मते मिळाली. भाजपने नागमठाण व महालगाव या दोन गणांत विजय मिळवाला. महालगाव गणातून शीतल राहुल आल्हाट या ४९९६ मते मिळवून विजयी झाल्या तर नागमठाण गणातून देविदास अण्णासाहेब सामसे यांनी ४९५७ मते मिळवून विजयश्री खेचून आणली.
खंडाळा गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हुसेन शहाबुद्दीन शेख हे ३२८७मते मिळवून विजयी झाले. पोखरी गणातून राधिका ज्ञानेश्वर ठुबे या ४७९० मते मिळवून विजयी झाल्या.