Shiv Sena forms five-member committee for alliance negotiations
संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिवसेनेने आगामी महापालिका निवडणूक भाजपसोबतच लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यादृष्टीने भाजपसोबत जागांच्या वाटाघाटी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि युवा सेनेचे ब्रीकेश जैस्वाल यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे बुधवारी रात्री छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीबाबत दोन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक त्रब्रीकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती. तर दुसऱ्या बैठकीला वरील सर्वांसोबतच आमदार विलास भुमरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन आदींची उपस्थिती होती.
आगामी महापालिका निवडणूक भाजपला सोबत घेऊनच लढायची आहे, असे शिंदे यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच सांगितले. त्यानंतर या निवडणुकीच्यादृष्टीने दोन समित्यांचे गठण करण्यात आले. पहिली समिती ही मुख्य समन्वयक समिती असणार आहे. यात पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार भुमरे, आमदार जैस्वाल, जिल्हाप्रमुख जंजाळ आणि त्रब्रीकेश जैस्वाल यांचा समावेश आहे.
ही समिती भाजपसोबत जागावाटपाची चर्चा करणार आहे. तर दुसरी समिती ही कार्यकारी समिती आहे. यात आमदार विलास भुमरे, रमेश बोरनारे, संजय जाधव, अब्दुल सत्तार, माजी आमदार किशनचंद तनवाणी, अण्णासाहेब माने, भाऊसाहेब चिकटगावकर, कैलास पाटील तसेच माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, त्र्यंबक तुपे आणि पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांचा समावेश आहे. ही समिती निवडणुकीच्या काळात नियोजनाचे काम पाहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक ही माझ्या नेतृत्वात लढली जाणार आहे. त्यासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील काही जण हे स्टार प्रचारक असतील. या दोन्ही समित्या प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज पाहतील.संजय शिरसाट, पालकमंत्री
अजित पवारांच्या राष्ट्रवादीविषयी संभ्रम
शिवसेनेने महापालिकेची निवडणूक भाजपसोबत लढण्याचे निश्चित केले आहे. परंतु यात महायुतीतील तिसरा घटक पक्ष म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असेल की नाही याविषयी संभ्रम आहे. तूर्तास शिंदेंच्या सेनेकडून केवळ भाजपसोबतच युतीचा प्रयत्न राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रवादी पक्ष तेवढा समक्ष नसल्याकारणाने त्यांना सोबत घेण्याची शिवसेनेची तयारी नसल्याचेही समजते.