Kharif Season : खरीप हंगामावर खत टंचाईचे सावट pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Kharif Season : खरीप हंगामावर खत टंचाईचे सावट

युरियाचा बफर स्टॉक तयार; डीएपीचा पुरवठा रखडला

पुढारी वृत्तसेवा

Shadow of Fertilizer Shortage Looms Over Kharif Season

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खत टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात युरियाचा बफर स्टॉक तयार करण्यात आला असला तरी डीएपी खताचा पुरवठा अद्याप रखडलेला आहे. पुढील आठवड्यात डीएपीची रेक लागण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्हा कृषी विभागाने खरीप हंगामासाठी शासनाकडे ३ लाख ९५ हजार ७४९ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. मात्र शासनाकडून केवळ २ लाख ९२ हजार ७०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. यापूर्वीच्या अनुभवावरून मंजूर आवंटनापेक्षाही कमी खत उपलब्ध होत असल्याने यंदा शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खत टंचाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी युरिया व डीएपीचा बफर स्टॉक तयार करण्यात येत आहे. सध्या १० हजार ५५० मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा उपलब्ध झाला असून, डीएपीची रेक अद्याप लागलेली नाही. रेक आल्यानंतर सुमारे ६५० मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध होणार आहे. संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड व कन्नड तालुक्यांसाठी प्रत्येकी १३०० मेट्रिक टन युरिया राखून ठेवण्यात आला आहे. तर खुलताबाद व सोयगाव तालुक्यांसाठी प्रत्येकी ९०० मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे.

जिल्ह्यासाठी युरियाचा बफर स्टॉक करण्यात येत आहे. डीएपी खताची रेक अद्याप लागलेली नसली तरी पुढील आठवड्यात ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
-प्रकाश पाटील, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT