Seven hundred and fifty tourists visited Siddhartha Udyan on the first day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय तब्बल दीड महिन्यानंतर सोमवारी (दि. २८) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. उद्यानासमोरील बॅरेकेट्स हटताच पर्यटकांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली. यात पहिलाच दिवशी प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात सुमारे ७५० हून अधिक पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे प्रवेश शुल्कातून महापालिकेच्या तिजोरीत ५० हजारांचे उत्पन्न जमा झाले.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वाराच्या डोमलगत असलेल्या भिंतीचा काही भाग कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मनपा प्रशासकांनी उद्यान बंद ठेवण्याचे आदेश देत प्रवेशद्वार आणि शॉपिंग कॉम्प् लेक्सच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचेही आदेश दिले होते. ११ जून रोजी ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर मालमत्ता विभागाने उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे स्टॅबिलिटी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेत त्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला होता.
अहवालानुसार प्रवेशाद्वाराचे डोम व बांधकाम काढून घेण्याचे आदेश देण्यात आले. मागील आठवड्यात मालमत्ता विभागाने क्रेनच्या साह्याने दोन टन वजनाचा डोम उतरून घेतला. त्यानंतर डोमसाठी करण्यात आलेले बांधकामाची पाडापाडी करून सोमवारपासून उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचे आदेश दिले.
आज सोमवारी सकाळी ८ वाजता सिद्धार्थ उद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्यासोबतच प्राणिसंग्रहालयही सुरू झाले. पावसाळी वातावरण असतानाही पर्यटकांसह बच्चेकंपनीने खेळण्याचा व फिरण्याचा आनंद लुटला. पुढील काही दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
उद्यानाला दिवसभरात साडेसातशेपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली. यात उद्यानात प्रवेशासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सिद्धार्थ उद्यानाला १६ हजार रुपये तर प्राणिसग्रहालयास ३४ हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांचे उत्पन्न तिकिटामधून प्राप्त झाले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.
सिद्धार्थ उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात, परंतु दीड महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे फिरणे बंद झाले होते. ज्येष्ठ व बयोवृद्ध नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने चौकशी सुरू असल्याचे कारण देत परवानगी नाकारली होती. आज सोमवारपासून सिद्धार्थ उद्यान खुले करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांना आता मॉर्निंग वॉक करता येणार आहे.