

Taking advantage of the darkness, a leopard attacked a farm house
वरठाण, पुढारी वृत्तसेवा: सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथील शेतवस्तीवर झोपलेल्या कुटुंबावर अंधाराचा फायदा घेत चक्क बिबट्याने हल्ला चढविला. परंतु कुटुंबीयांच्या बाजूला झोपलेला कुत्रा बिबट्यावर भुंकल्याने चवताळलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढविल्याची घटना जंगली कोठे शिवारात रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या हल्ल्यातून कुटुंब मात्र बचावले आहे.
तालुक्यातील बोरमाळ तांडा येथील कुटुंब जंगलीकोठे शिवारात पिकांच्या संरक्षणसाठी शेतावर राहण्यासाठी आले आहे. दरम्यान जंगली कोठे शिवारात गट क्र. १०५ मधील असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये माधव कन्हाळे (४४) हे आपल्या कुटुंबाच्या सोजाबाई कन्हाळे (७५), माधव कन्हाळे (४४), सुमित्राबाई कन्हाळे (३५), भोळेश्वर कन्हाळे (११), जयेश कन्हाळे (९) शिवाजी कन्हाळे (३४) या सहा सदस्यांसोबत झोपलेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत शेतातून बिबट्या आला.
या बिबट्यावर कुटुंबाशेजारीच पाच फुटांवर असलेल्या कुत्र्याने बिबट्यावर भुंकल्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने चक्क झोप लेल्या कुटुंबाजवळून पाच फुटांवरून या कुत्र्याला उचलून नेले. दरम्यान तरीही कुत्र्याने बिबट्याशी झुंज देत बिबट्याच्या तावडीतून सुटका केली, मात्र यामध्ये बिबट्याने कुत्र्याच्या मानेवर चावा घेतल्याने कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान जंगली कोठे शिवारात गेल्या तीन दिवसांपासून बीज पुरवठा ठप्प झालेला आहे.
अद्यापही या भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला नसल्याचा आरोप शेतकरी माधव कन्हाळे यांनी केला आहे. या शिवारात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबटे शेतशिवारात येत आहेत. एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेल्यावर महावितरणला जाग येईल का, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी विचारला आहे.
दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये झोप-लेल्या कुटुंबातील सदस्याजवळ पाच फूट अंतरावर असलेल्या कुत्र्याने या कुटुंबाची जबाबदारी घेत कुत्र्याने बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेत कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. या भागात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतवस्तीवर शेतकऱ्यांना अंधारातच राहावे लागत आहे. महावितरणकडे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही या भागातील वीज पुरवठ्याचा बिघाड दूर होत नसल्याचे राहुल चव्हाण यांनी सांगितले.