मन्सुर कादरी
सिल्लोड : सिल्लोड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगतदार बनली असून, छाननी प्रक्रियेनंतर नगराध्यक्ष पदासाठी १० अर्ज वैध ठरले होते, १४ प्रभागांतील २८ नगरसेवक पदांसाठी १११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ३ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल २२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता अंतिम नगराध्यक्षपदासाठी ७, नगरसेवक पदांसाठी ८९ उमेदवार उरले आहेत. या निवडणुकीत ५४ हजार ८०८ मतदार आपल्या मतदानात बजावतील. हक्क रिंगणात तर २८ शहरातील १४ प्रभागांमधून प्रत्येकी दोन असे २८ नगरसेवक निवडले जाणार असून, यातील १४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे आगामी सभागृहात किमान १४ महिला नगरसेवकांची उपस्थिती निश्चित आहे.
नगराध्यक्ष पदासाठीची मुख्य लढत माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर (शिवसेना शिंदे गट), माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण (वंचित बहुजन आघाडी ड्डू महाविकास आघाडी संयुक्त) आणि भाजपाचे मनोज मोरेलू यांच्यात चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राजू रोजेकर (बसपा), अमोल कुदळ (अपक्ष), शेख अजीम सिद्ध (अपक्ष) आणि अमोल दुधे (अपक्ष) हेही रिंगणात असून आपले नशीब आजमावणार आहेत.
सिल्लोड नगराध्यक्षपद हे यंदा सर्वसाधारणसाठी खुले असून निवड थेट जनतेतून होणार असल्याने आणि नगरसेवकांच्या २८ जागांसाठी ८९ उमेदवारांनी मैदान सोडण्यास नकार दिल्याने संपूर्ण शहरात निवडणूक तापली आहे. अनेक प्रभागांत थेट तर अनेक ठिकाणी तिरंगी लढतींमुळे मतदारांसाठी हा निवडणूक महोत्सव अधिकच रोचक ठरणार आहे.
तिरंगी संघर्ष होणार
३ अ, ५ अ, ७व, ९ अ, १० व, १२ ब, १३ अ, १४ अव १४ व अशा ९ जागांवर तिरंगी संघर्ष होणार असून मतदारांसाठी हेच प्रभाग निवडणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. उर्वरित विविध प्रभागातील १० जागांवर ४ किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतही रंगत
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतही रंगत वाढली आहे. वैध ठरलेल्या १० उमेदवारांपैकी शिवसेना (शिंदे गट) च्या फिरदौसजहाँ रईस खान यांनी पहिल्याच दिवशी माघार घेतली होती, तर शेवटच्या दिवशी भाजपाचे कमलेश कटारिया व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे दीपक घरमोडे यांनी माघार घेऊन स्पर्धेतून बाहेर पडले. त्यामुळे अखेरीस ७ उमेदवारांचे रिंगण निश्चित झाले आहे.