Selling syrup for drug use through a minor.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
नशेच्या रॅकेटमध्ये अल्पवयीन मुलांना वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार एनडीपीएस पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे. नशेसाठी सिरप विक्री करताना पथकाने १७ वर्षाच्या मुलाला पकडले.
त्याच्याकडून २७सिरपच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई कटकट गेट रस्त्यावरील रवींद्र कॉलनी येथील मैदानावर करण्यात आली. त्याला माल पुरविणारा अविनाश पाचुंदे (रा. अनिसा शाळेच्या मागे) असल्याचे समोर आले आहे. पाचुंदेवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, एनडीपीएस पथकाचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना एक मुलगा कटकटगेट भागातील रवींद्र कॉलनीजवळील मैदानावर धक्कादायक प्रकार उघड औषधी बाटल्यांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी एपीआय रविकांत गच्चे यांना कळवून वरिष्ठांच्या परवानगीने पथकासह मैदानावर पोहोचले.
तिथे विधीसंघर्षग्रस्त १७ वर्षांच्या मुलाची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे २७सिरपच्या बाटल्या मिळून आल्या त्याने या सिरपच्या बाटल्या आरोपी अविनाश पाचुंदे यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले-त्यावरून पोलिसांनी बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी अविनाश राजपूत यांच्या मार्गदर्शनात एपीआय रविकांत गच्चे पीएसआय अमोल म्हस्के, जमादार लाल खान पठाण, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, छाया लांडगे यांच्या पथकाने केली.