छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नशेच्या गोळ्यांची विक्री करताना पकडल्यानंतर ८ महिने जेलमध्ये राहून आल्यानंतर पुन्हा तोच धंदा सुरू केलेल्या सराईत आरोपीला एनडीपीएसच्या पथकाने पुन्हा बेड्या ठोकल्या. ही कारवाई मंगळवारी (दि. २६) ६ मिसारवाडीच्या गल्ली क्र. ३ येथे करण्यात आली. शेख आसीफ शेख जिलानी ऊर्फ जोहरी (३९, नरा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून २०७ गोळ्या जप्त केल्याची माहिती न गीता बागवडे यांनी बुधवारी दिली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी एनडीपीएसचे तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक गीता बागवडे यांना असिफ पुन्हा बटन गोळ्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकासह छापा मारला. त्याच्या घरातून निट्रीसन-१० या नावाच्या तब्बल २०७नशेच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. आसिफ याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात - एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात ने आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, जमादार लालाखान पठाण, संदीपन धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदडे, महेश उगले, छाया लांडगे, काळे यांनी केली. दरम्यान, पोलिस छापा मरण्यासाठी गेल्यानंतर मालाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीच्या घरातील सदस्य गोंधळ घालून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पथकावर मिरचीच्या पाण्याने हल्लाही झाला होता.
एनडीपीएसने केलेल्या अनेक कारवायांमध्ये जप्त गोळ्या या बनावट नसल्याचे समोर आले आहे. अन्न व औषधी प्रशासनानेही जप्त गोळ्यांबाबत तपास केल्यानंतर कंपन्यांनीही गोळ्या त्यांच्याच असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कंपनीतून गोळ्या वितरकाकडे येतात. एका बॅचचा माल वितरक देशातील ५०० ते ७०० मेडिकल चालकांना विक्री करतो. तेथून गोळ्या वेगवेगळ्या शहरात जात असल्याने कोण कोणाला कशी विक्री करतो हे उघड करणे यंत्रणेसमोरचे मोठे आव्हान आहे. यापूर्वी उस्मानपुरा भागातील एक वितरक व नाशिकच्या एका मेडिकल चालकापर्यंत एनडीपीएसच्या पथकाने अटक करून गोरखधंदा उघड केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींचे नातेवाईक परराज्यात आहेत. त्यांच्यामार्फत गोळ्यांचे पार्सल गुजरात आणि मध्यप्रदेश येथून मोठ्याप्रमाणात शहरात येत आहे.