

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बोथरा पेट्रोलपंपाच्या आवारात ज्वलनशील पदार्थ शिंपडून त्यावर आग लावून पेट्रोलपंप जाळण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २५) रात्री साडेनऊ वाजेला घडला. सुदैवाने तेथील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ही आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शाहरुख हमीद शेख (रा. खंडोबानगर, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.
त्यामुळे मोठा स्फोट होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता होती. या गोंधळात ज्वलनशील पदार्थ शिंपडून पंपाला आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या नशेबाज व्यक्तीने तेथून पळ काढला. याप्रकरणी पंप मालक नंदलाल सुरजमल बोथरा (रा. अहिंसानगर, संभाजीनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून शाहरुख हमीद शेख (रा. खंडोबानगर, वैजापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोमवारी (दि.25) रात्री पेट्रोलपंपावरील एक कर्मचारी अजहर ताहेर शेख यांनी फोन करून नंदलाल बोथरा यांना कळवले की शाहरुख याने शेजारच्या उस्मान चहाच्या हॉटेलमधून प्लास्टिकच्या बॉटेलमध्ये ज्वलनशील पदार्थ आणून पेट्रोलपंप परिसरात टाकला व खिशातील काडीपेटी काढून तेथे आग लावून पेटवून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाली आहे. या तरुणाने लाल रंगाचा शर्ट घातला असून, त्याने एका बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणून तो पेट्रोलपंपाजवळ शिंपडला व नंतर काडीने आग लावून तेथून पळ काढल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र त्याने हे कृत्य कशामुळे केले याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही. याबाबत कायदेशीर कार्यवाही सुरू असून, पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. त्यानंतरच घटनेबाबत अधिक खुलासा करता येईल, असे सांगण्यात आले.
पेट्रोलपंप मालक व आरोपी यांच्यात कुठलाही वाद नव्हता, मग आग लावण्यामागे हेतू काय? केवळ दारूच्या नशेत कृत्य की यामागे काही गुप्त राग अथवा दहशत पसरवण्याचा प्रयत्न होता, कारण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारे आग लावण्याइतका धक्कादायक विचार कसा सुचला, असा प्रश्न शहरातील नागरिकांच्या मनात कायम आहे.