Kannad school teacher death
कन्नड : शहरातील श्रीराम कॉलनी येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला शिक्षिकेने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना बुधवारी (दि. २४) सकाळी ९ वाजता उघडकीस आली. वैशाली राजेंद्र तायडे (शेलार, वय ४५) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली तायडे व राजेंद्र तायडे हे पती-पत्नी तालुक्यातील मेहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका व शिक्षक म्हणून कार्यरत होते. राजेंद्र तायडे यांच्या आईला अर्धांगवायू झाल्याने त्यांना गावाकडे भेट देण्यासाठी राजेंद्र तायडे हे दोन-तीन दिवसांची रजा टाकण्यासाठी शाळेत गेले होते.
यावेळी वैशाली या घरी एकट्याच होत्या. घटनेपूर्वी वैशाली यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यावर ७० हजार रुपये पाठवले होते. आई नेहमी पैसे पाठवताना वारंवार चौकशी करते; मात्र अचानक इतकी मोठी रक्कम पाठविल्याने मुलाला संशय आला. त्याने आईला फोन केला असता फोन उचलला गेला नाही. त्यानंतर त्याने वडिलांशी संपर्क साधून तात्काळ घरी जाण्याची विनंती केली.
राजेंद्र तायडे घरी आले असता घर आतून बंद असल्याचे आढळून आले. नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता वैशाली या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तात्काळ खाली उतरवून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा गीते यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कन्नड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नासिर पठाण करीत आहेत.