

A former village sarpanch was murdered, and the villagers demolished the encroachments of the accused
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओहर गावात जमिनीच्या वादातून झालेल्या माजी सरपंचाच्या निघृण हत्येचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या हत्याकांडातील मुख्य आर-ोपींच्या मनमानी कारभाराविरुद्ध मंगळवारी (दि.२३) ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत झालेल्या निर्णयानुसार, आरोपींनी गावातील मुख्य चौकात केलेले अवैध अतिक्रमण आणि दुकान पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले.
माजी सरपंच दादा पठाण यांची जमिनीच्या वादातून ११ जणांच्या टोळक्याने १७ डिसेंबरला निघृण हत्या केल्यानंतर ओहर गावात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण होते. मंगळव- ारी आयोजित ग्रामसभेत गावकऱ्यांनी आरोपींच्या दहशतीविरुद्ध आवाज उठवला.
गावाच्या मुख्य चौकात आरोपींनी बेकायदेशीरपणे दुकान थाटून अतिक्रमण केले होते. या ठिकाणी दररोज टवाळखोर मुलांचा वावर असायचा, ज्यामुळे महिला आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर ग्रामसभेने हे अतिक्रमण हटवण्याचा ठराव मंजूर केला आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करत दुकान पाडून टाकले.
४ आरोपी जेरबंद
हसूल पोलिसांनी आणखी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. जमीर इनायत पठाण, मोइन इनायत पठाण, फुरखान अजगर खान पठाण, असलम खान ऊर्फ गुड्डू गयाज खान पठाण अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकाच कुटुंबातील ११ आरोपींचा समावेश असून, यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली होती. दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.