Sanjay Shirsat criticized the leaders of the MIM party
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा आणि महाराष्ट्रासंदर्भात एमआयएम नेत्यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. हा देश कोणत्याही एका जाती-धर्माचा नाही. अशा प्रकारची भडकाऊ विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो देशाच्या संस्कृतीला घातक आहे, अशा शब्दांत त्यांनी एमआयएमला ठणकावले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर शिरसाट प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविकेने हिरवा मुंब्रा करण्याच्या दिलेल्या घोषणेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, संबंधित नगरसेविकेच्या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. खुद्द मुस्लिम समाजालाही ही विधाने रुच लेली नाहीत. हा देश कुण्या एका जाती धर्माचा नाही, या देशाची संस्कृती जपण्याचे काम प्रत्येक भारतीय करतो. कोणी अतिशयोक्ती करत असेल तर त्याला योग्य वेळी जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देत शिरसाट पुढे म्हणाले, काही लोकांमध्ये सत्तेची आणि पदाची मस्ती आली आहे. पाच-पन्नास नगरसेवक निवडून आले म्हणजे तुम्ही राज्यावर आक्रमण करणार का?
तुमची ही गुर्मी आम्ही निश्चित उतरवू. एकदा जर आम्ही रस्त्यावर आलो, तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. संबंधित नगरसेविकेने माफीनामा दिला होता, मात्र तिला पुन्हा उचकवून वक्तव्यावर ठाम राहण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. यावेळी त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. दबावाचे हे राजकारण आम्ही सहन करणार नाही. संघर्षाची वेळ आली तर आम्ही मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिरसाट अन् खैरे यांच्यातील सॉफ्ट कॉर्नर पुन्हा चर्चेत
राजकीय मैदानात एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी पालकमंत्री संजय शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील स्नेहबंध प्रजासत्ताक दिनानिमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात शिरसाट आणि अंबादास दानवे यांच्यातील वाकयुद्ध सर्वश्रुत असताना, खैरे यांच्याबाबत मात्र शिरसाट नेहमीच मवाळ भूमिका घेताना दिसतात. २६ जानेवारी रोजी पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर संचलनादरम्यान पालकमंत्री शिरसाट हे सलामी स्वीकारत असताना त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी त्यांना हात जोडले असता, शिरसाटांनीही बरा चाललंय ना? अशी इशाऱ्यानेच विचारपूस केली.