Sambhajinagar's Government ITI is the best in the state
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दर्जेदार कौशल्य प्रशिक्षणातील उल्लेखनीय कार्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यातील सर्वोत्तम आयटीआय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आणि उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे शनिवारी हा सोहळा पार पडला. भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय संचालक सतीश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवगिरी आयटीआयने प्रशिक्षण गुणवत्ता, उद्योग सहकार्य, प्लेसमेंट, ऑन-जॉब ट्रेनिंग, आधुनिक यंत्रसामग्री, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शासनाच्या निकषांनुसार संस्थेने सर्व बाबींमध्ये उच्च गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेने उद्योगांसोबत प्रभावी समन्वय, प्रशिक्षणानंतर उच्च प्रमाणात रोजगार उपलब्धता, आधुनिक प्रयोगशाळा व कार्यशाळा सुविधा, कौशल्याधारित शिक्षणाचा प्रभावी अंमल बाबींमध्ये विशेष प्रगती साधली आहे. देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या २८ व्यवसाय आणि ८५ तुकड्या असून सुमारे अठराशेहून अधिक विद्यार्थी आधुनिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण घेत आहेत. ही संस्था केवळ शिक्षण देणारी नसून कौशल्य विकासाचे सशक्त केंद्र म्हणून उदयास आली आहे.
सीएसआर माध्यमातून संस्थेत ११ आधुनिक लॅब्स उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्ये प्रत्यक्ष शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेप अंतर्गत ४८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, उद्य-ोगांशी करार, तसेच कारागृहातील कैद्यांसाठी पुनर्वसनात्मक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांमुळे संस्थेने समाजाभिमुखतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.
देवगिरी शासकीय आयटीआयचा हा सन्मान केवळ संस्थेसाठीच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा विभागासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. संस्थेच्या प्राचार्य, प्रशिक्षक व विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे हे फळ आहे. महाराष्ट्रातील कौशल्य विकास क्षेत्रात देवगिरी आयटीआयने नवा आदर्श निर्माण करत सर्वोत्तम आयटीआय हा किताब पटकावला आहे.प्रदीप दुर्गे, उपसंचालक, देवगिरी शासकीय आयटीआय