योगा शिक्षकाचा चालकावर जीवघेणा हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : योगा शिक्षकाचा चालकावर जीवघेणा हल्ला

भटक्या कुत्र्यांना मांस टाकण्यास विरोध केल्याने हल्ला; बाप-लेकाला ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Yoga Teacher Launches Life-Threatening Attack on Driver

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पडेगाव भागातील कासलिवाल तारांगण सोसायटीत भटक्या कुत्र्यांना मांस खायला देणाऱ्यास विरोध केल्याच्या वादातून एका चालकावर बाप लेकाने सिमेंटच्या पोलने जीवघेणा हल्ला केला. डोक्यात दोन घाव घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास घडली.

सचिन कुमार सुगंध फुलपगार (४२) आणि सुगंध मारोती फुलपगार (७२, दोघेही रा. कासलीवाल तारांगण, पडेगाव) अशी आरोपींची नावे असून, दोघांना अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. दरम्यान, आरोपी सचिन कुमार हा योगा शिक्षक असून, त्याच्या कार्याची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

जखमी संदेश यांची पत्नी फिर्यादी संगीता संदेश मारेकर (३२) यांच्या तक्रारीनुसार, त्या कुटुंबीयांसह कासलीवाल तारांगण, पडेगाव येथे वास्तव्यास आहेत. याच सोसायटीत आरोपी सचिन कुमार हा नेहमी परिसरातील भटक्या कुत्र्यांना जमा करून त्यांना बाहेरून आणलेले मांस व इतर पदार्थ खायला घालत असे. कुत्रे मांसाचे तुकडे कुठेही नेऊन टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती आणि कुत्र्यांच्या वावरही प्रचंड वाढला होता. या त्रासामुळे सोसायटीतील नागरिकांनी आरोपी सचिन कुमार याला अनेकदा समजावून सांगितले होते, मात्र तो कोणाचेही ऐकत नव्हता.

आज इसको खतमही कर देते है...

सोमवारी (दि. ६) रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास संदेश मारेकर हे त्यांच्या बिल्डिंगखाली बसलेले होते. त्यावेळी आरोपी सचिन कुमार आणि त्याचे वडील त्या ठिकाणी आले. सचिनने आपल्या वडिलांना उद्देशून पपा यह संदेश मारेकर है, पकडो इसको आज इसको खतमही कर देते है, असे म्हणत चिथावणी दिली. त्यानंतर सचिनच्या वडिलांनी संदेश यांना घट्ट पकडून ठेवले आणि सचिनने जिवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटच्या पोलने संदेश यांच्या डोक्यात दोन वेळा प्रहार केला. या हल्ल्यात संदेश रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळले. संगीता यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदेश यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT