Sambhajinagar Wife ran away from the road with jewelry and money
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जीवनाच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणाऱ्या मुलाचे लग्न करून संसाराला लावण्यासाठी धडपड करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याच्या स्वप्नांचा फुगा क्षणात फुटला. कोर्ट मॅरेजच्या नावाखाली बनावट लग्न लागणाऱ्या महिलांच्या टोळीने पैसे, सोन्याचे दागिने असा ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज घेऊन धूम ठोकली. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी सिडको एन-६ भागात घडला.
ज्योती राजू गायकवाड (बोगस नाव ज्योती मिसाळ, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), माया मधुकर शिंदे (रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि सविता मधुकर शिंदे (रा. दुसरबीड, जि. बुलढाणा) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. फिर्यादी (४५) हे नाशिक जिल्ह्यातील असून, पत्नी व दोन मुलांसह शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा (राहुल नाव बदलेले) याच्या लग्नासाठी योग्य मुलगी पाहण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकासाठी काम करणारी सीमाने ओळ खीतील मुलगी असल्याचे सांगितले.
फोटो, बायोडेटा मागविल्यानंतर मुलगी पसंत असल्याने पुढची बोलणी करण्यासाठी मुलीची मावशी म्हणून सीमाने ज्योती गायकवाड हिच्याशी भेटण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंब २३ सप्टेंबरला सिडको एन-६ भागात ज्योतीच्या घरी आले. तिथे ज्योती, रेखा मिसाळ व मुलगी माया हजर होत्या. मुलीच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले असून, आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची थाप मारली. मुलगी व तिचे कुटुंब पाहिल्यानंतर फिर्यादींना मुलगी पसंत पडली. तेव्हा आरोपींनी मुलीच्या आईच्या आजारपणाचा मुद्दा काढत, तिच्या उपचारासाठी व दागिन्यांसाठी १.८० लाखांची मागणी केली.
तसेच लग्न कोर्ट मॅरेजद्वारे करायचे ठरले. त्यासाठी आरोपींनी वकिलाला पाच हजार पाठवायला लावले. त्यानंतर १ लाख रोख, ३० हजार फोनपेद्वारे, ५० हजार मित्रामार्फत आणि १.७९ लाखांचे सोन्याचे दागिने असे एकूण ३.८६ लाखांचे शेतकरी कुटुंबाने व्यवहार केले. तसेच कपडे व भेटवस्तूंसाठी १० हजार खर्च केले. २४ सप्टेंबर रोजी सकाळी सर्व मंडळी जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेजसाठी जमली. तलवार नावाच्या वकिलाने मुला-मुलीची कागदपत्रे घेतली व फी म्हणून १२ हजार घेतले. त्यानंतर मुलगी सोबत घेऊन कुटुंबीय गावाकडे निघाले.
थोड्या अंतरावर हॉटेलवर थाबल्यानंतर कुटुंब चहा पिण्यासाठी खाली उतरले. त्याच क्षणी एक पांढऱ्या रंगाची विनाक्रमांक स्कॉर्पिओ गाडी आली आणि मुलगी माया शिंदे अचानक त्या गाडीत बसून पसार झाली.
सुरुवातीला बदनामीच्या भीतीने शेतकऱ्याने तक्रार दिली नाही. मात्र काही दिवसांनी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात आल्याचे कळल्यानंतर त्यांनी जाऊन शहानिशा केली. पोलिसांच्या ताब्यातील महिला पाहिल्यानंतर त्या त्याच असल्याचे त्यांनी ओळ-खले. त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.१८) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.