Sambhajinagar Water Supply News
छत्रपती संभाजनीरग, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाचा पहिला टप्पा म्हणजेच ए-विंगचे काम पूर्ण होऊन येथे पंप बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या ५ सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, दिवाळीनंतर म्हणजेच ३१ ऑक्टोबरपासून नव्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी शुक्रवारी (दि.२२) पाणीपुरवठा योजनेच्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयात न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्यासमोर सांगितले.
मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी उच्च न्यायालयातर्फे नियुक्ती समितीच्या १२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या बैठकीचे इतीवृत्त सादर केले. ज्यात योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, जॅकवेलच्या बी आणि सी विंगचे काम पूर्ण करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करावे, अशा योजनेच्या विविध कामाबाबत समितीने दिलेल्या सूचनांचा समावेश आहे. या जनहित याचिकेवर १२ सप्टेंबर २०२५ ला पुढील सुनावणी होणार आहे.
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. आता शहराला २६ एमएलडी अधिक पाणीपुरवठा होणार आहे. त्याचे उद्घाटन आज शनिवारी (दि. २३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे निवेदन करण्यात आले. दरम्यान, नव्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरवासीयांना ३१ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या बर्यापैकी सुटणार आहे.
शहरासाठी टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून ७६ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा होत असल्याने आता शहरवासीयांना ८ ते ११ दिवसांआडऐवजी ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करा, अशी अपेक्षा अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.