

The Karvande family in Hatnur has erected a statue of a bull in their field.
कन्नड / हतनूर, पुढारी वृत्तसेवा: गेला माझा बैल, कष्टांचा सोबती, डोळ्यांत पाणी, काळजात खंत ती। पुतळा त्याचा शेतामध्ये उभा, स्मरणांत जिवंत, प्रेमाचं नातं न भंगता ? तालुक्यातील हतनूर येथील एका शेतकऱ्याने आपल्या दगावलेल्या बैलाची आठवण कायम राहावी म्हणून त्याचा पुतळा बनवून शेतात उभारला. पोळा सणानिमित्त त्याची मनोभावे पूजा करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर घालून दिला आहे.
हतनूर येथील प्रगतिशील शेतकरी सुधाकर करवंदे यांचा राजा नावाचा बैल दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने मृत पावला. त्याचाअंत्यसंस्कार शेतात करण्यात आले. हा बैल गेल्या पंधरा वर्षांपासून करवंदे कुटुंबाकडे होता. यामुळे सदर बैल हा त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्यच होता.
बैल पांढरा शुभ्र अन् देखणा, प्रत्येक पोळा सणाला इतरांचे लक्ष वेधून घेणारा राजा म्हणून त्याची ओळख होती. राजा आपल्याला सोडून गेल्याची सल करवंदे कुटुंबाच्या मनात होती. यामुळे त्यांनी त्याच्या फोटोनुसार बैलाचा पुतळा कारागीराकडून हुबेहूब पंचवीस हजार रुपये खर्च करून बनवून घेतला. पोळा सणाच्या काही दिवस आधी शेतातील गुरांच्या गोठ्याच्या बाजूला एक सिमेंट ओटा बनवून हा पुतळा बसवला.
एकीकडे आधुनिक यांत्रिक युगात काळाच्या ओघात पशुधनाची संख्या कमालीची कमी झाली. या युगात जन्मदात्या आई-वडिलांना लोक आठवणीत ठेवत नाहीत, अशा परिस्थितीत पंधरा वर्षे आपल्या शेतातील कामात मदत करण्याऱ्या बैलाचा पुतळा बसवून करवंदे कुटुंबाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. या पुतळ्याची सुधाकर करवंदे व त्यांच्या पत्नी यांनी मनोभावे पूजा करून मगच आपले उर्वरित बैल पोळा साजरा करण्यासाठी गावात आणले.
तालुक्यात बैलाचा पुतळा बनवून शेतात बसविण्याची ही पहिलीच घटना असून याठिकाणी गावातील माजी सरपंच पंढरीनाथ काळे, प्रभाकर सोनवणे, भिवसन गायकवाड, ग्रा प. सदस्य संतोष करवंदे, नितीन तनपुरे आदींनी भेट दिली. राजा नावाचा बैल हा आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षापासून होता दोन वषापुर्वी वय झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दीर्घ काळ आमच्या सोबत राहिल्याने तो आमच्या घरातील एक सदस्यच होता. त्याची आठवण आम्हला व आमच्या पिढीला कायम राहावी म्हणून आम्ही त्याचा हुबेहूब पुतळा बनवून शेतात बसवला असल्याची माहिती सुधाकर करवंदे यांनी दिली.