

After getting out of jail, he stole 13 more bikes in two months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा स्वतःची दुचाकी चोरीला गेल्याच्या रागातून दुचाकी चोरीचे सत्र सुरू केलेल्या सराईत आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच अटक करून १० दुचाकी हस्तगत केल्या होत्या. त्यानंतर बाहेर येताच त्याने पुन्हा १३ दुचाकी चोरी केल्या. त्याला जवाहर नगर पोलिसांनी पकडून काही दिवसांपूर्वीच ७ दुचाकी हस्तगत केल्या. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन आणखी ६ दुचाकी जप्त केल्या.
राहुल ऊर्फ पप्पू बबन राठोड (२२, रा. नाईकनगर, माऊलीनगर) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. फिर्यादी बाबासाहेब निवृत्त आबूज यांची दुचाकी २९ जुलैला शिवाजीनगर भुयारी मार्गाजवळून चोरीला गेली होती.
पुंडलिकनगर ठाण्याच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, जमादार प्रकाश डोंगरे, प्रशांत नरोडे, कल्याण निकम, अजय कांबळे, विलास सोळंके, संदीप बीडकर यांच्या पथकाने राठोडला हर्सल जेलमधून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने चोरी केलेल्या सहा दुचाकी निर्जनस्थळी सोडून दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या.
राठोड हा सराईत दुचाकी चोर असून त्याच्याकडे मास्टर चाव्या आहेत. त्याचा वापर करून तो दुचाकी चोरी करतो. पेट्रोल संपेपर्यंत वापरून नंतर निर्जनस्थळी दुचाकी सोडून देतो.