वैजापूर : आगामी निवडणुका लक्षात घेऊन मतदार यादी पूर्णपणे अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने विशेष पुनरीक्षण अभियान (एसआयआर) राबविण्याचे आदेश जारी केले आहेत.
या मोहिमेसाठी सर्व मतदान केंद्रस्तर अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षकांना कडक सूचना देण्यात आल्या असून, पुढील 15 दिवसांसाठी त्यांना त्यांच्या मूळ कामकाजातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार 16 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत तालुक्यात घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करणे, धूसर (ब्लर) फोटो बदलणे, नवीन रंगीत फोटो संकलित करणे, तसेच डीएसई नोंदणीची तपासणी करणे यासारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या मोहिमेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. सर्व बीएलओंना आपल्या कार्यक्षेत्रातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक राहणार आहे. मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघटना व विविध संस्थांची मदत घेत जनजागृती अभियानही राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, आदेशात स्पष्ट इशारा देण्यात आला असून, कामात निष्काळजीपणा, विलंब किंवा सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादी पारदर्शक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त तयार करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या मतदानाशी संबंधित माहिती तपासून बीएलओंना योग्य माहिती द्यावी.आगामी काळात मतदारयादी त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोना करण्यात येणार आहे.
353 अधिकारी कार्यमुक्त
वैजापूर तालुक्यात सुरू होणाऱ्या या विशेष पुनरीक्षण अभियानासाठी एकूण 353 जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांचा समावेश करण्यात आला असून, ज्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी ग््राामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत प्रशासनाकडून या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण मिळण्याची शक्यता आहे.