

सिल्लोड : रस्ता ओलांडताना दुचाकीला बसची धडक बसून झालेल्या अपघातात एक अठ्ठावीस वर्षीय तरुण ठार झाला. हा अपघात सोमवारी (दि.16) दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती संभाजीनगर नाक्यावर घडला.
अजिनाथ धोंडीराम फुले (28, रा. पिंपळगाव पेठ, ता. सिल्लोड) असे तरुणाचे नाव आहे.मृत तरुण दुचाकीवरून (एमएच- 20, एफएच- 8334) छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील रस्ता ओलांडत होता. या दरम्यान मलकापूर- पुणे बस (एमएच-14, एमएच- 1475) सिल्लोडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती.
रस्ता ओलांडताना अंदाज न आल्याने दुचाकीला बसने धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला. वर्दळीचे ठिकाण असल्याने अपघात होताच नागरिकांना मोठी गर्दी केली व तरुणाला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. तरुणावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक चार वर्षांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. अपघाताची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करीत आहेत.