सुखना नदीपात्रातील अतिक्रमण काढताना महापालिकेचे पथक. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar river encroachment demolition : सुखना नदीपात्रातील ८५ बांधकामे भुईसपाट

महापालिका अतिक्रमण विभागाची मोहीम, नैसर्गिक जलस्रोत मोकळे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने खामनदी पाठोपाठ आता सुखना नदीपात्रातील अतिक्रमणांवरही हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. २५) आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने विभागप्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सुखना नदीपात्रातील तब्बल ८५ कच्ची पक्की बांधकामे जमीनदोस्त करून नैसर्गिक जलस्रोत मोकळे केले. या कारवाईने परिसरातील भूमाफियांमध्ये दहशत पसरली आहे.

शहरातील जुन्या व ऐतिहासिक नदींच्या वाचविण्यासाठी महापालिकेने नमामी गंगेच्या धर्तीवर अगोदर खामनदी स्वच्छता व पुनरुज्जीवन उपक्रम राबविला. यानंतर मागील सहा महिन्यांपासून प्रशासनाने चिकलठाणा परिसरातील सुखना नदीचे पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानुसार नदीपात्रावर दगडांचा वापर करून पिचिंग केले जात आहे.

या नदीपात्राच्या एकाबाजूने मोठ्याप्रमाणात अतिक्रमण आहे. तर दुसऱ्या बाजूने नदीपात्र मोकळे आहे. त्यामुळे मोकळ्या बाजूने नदीपात्राच्या पिचिंगचे काम सुरळीत आणि जलदगतीने सुरू आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अतिक्रमणांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कामात अडतळे येत असल्याने ही माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्त अमोल येडगे यांना दिली.

याअगोदर नगरसेवक मनोज गांगवे, रवी कावडे या नगरसेवकांनी देखील अनेकवेळा सुखना नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत ओरड केली होती. अखेर शनिवारी आयुक्तांच्या आदेशाने पथक जेसीबीसह चौधरी कॉलनी परिसरात दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातील कच्ची पक्की ८५ बांधकामे जमीनदोस्त केली.

या कारवाईत सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक प्राप्ती जाधव, गणेश वीर, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, संदीप काकनाटे, जेसीबी चालक दराडे आणि नागरी मित्र पथकाच्या जवानांनी सहभाग नोंदवला. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खाम नदीपात्रात अनेकांनी घरेच बांधली

सुखना नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यास शनिवारी सुरुवात झाली. पात्र अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे सुखना नदीपेक्षा अधिक अतिक्रमण हे खाम नदीपात्रात होते यापूर्वी खाम नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात आली परंतु, त्यानंतर पुन्हा अनेकांनी पात्रात घुसखोरी करीत अख्ख घरेच उभी केले आहेत. त्यामुळे या अतिक्रमणांवर महापालिका मान्सूनपूर्वीच मोहीम राबवून खाम नदीतील पावसाळ्यातील धोका टाळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT