Sambhajinagar Shivajinagar Subway Citizen inconvenience
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : बीड बायपास पलीकडील नागरिकांसह वाहनधारकांना शहरात येताना शिवाजीनगर भुयारी मार्गातून दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा सहन करत यावे लागत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायलर झाला. यात भुयारी मार्गाची दयनीय अवस्था पाहून नागरिकांकडून रेल्वे प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्ग नागरिकांसाठी सुविधाऐवजी डोकेदुखी बनला आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या सलग पावसामुळे या मार्गाला केवळ गळती नाही तर छोटेखानी धबधब्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मार्गात साचलेले पाणी आणि टपावरून वाहणारा छोटेखानी धबधबा अशा दोन्ही प्रकारे पाण्याचा मारा सहन करत मार्ग काढावा लागत आहे. सातारा, दे-वळाईसह बीड बायपास मार्गावरील रहिवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे वाटत असतानाच यात अडचणीच जास्त येत असल्याच्या व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. हे पाहून नागरिकांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचा अनुभव येत आहे.
बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन पावसाचे कारण पुढे करत काम करण्याची जबाबदारी टाळत आहे. आहे त्या परस्थितीतून मार्ग काढता काढता नागरिकांसह वाहनधारकांची सहनशक्तीही संपली आहे. शहरातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाची दोन ते तीन महिन्यांतच अशी अवस्था झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी सध्या एका बाजूने मार्ग सुरू आहे. मात्र या मार्गाबाबत काहीच माहिती नसल्याने पायी जाणारे नागरिक रस्ता मोकळा दिसल्याने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हा मार्ग पुढे बंद करण्यात आल्याने त्यांना पुन्हा परत फिरून मार्ग शोधण्याची वेळ आली आहे.
भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानेही घसरगुंडी तयार झाली आहे. यामुळे अनेक वाहने येथे स्लीप होऊन अपघात होत आहेत. एकीकडे दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा आणि दुसऱ्या बाजूने निर्माण झालेल्या घसरगुंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यावर रेल्वे प्रशासनासह बांधकाम विभागाने तात्काळ मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.