

offer make 10,000 opposition votes disappear former minister Bachchu Kadu
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीत विरोधातील दहा हजार मते गायब करण्याची आणि दहा हजार मते वाढवण्याची आपल्यालाही ऑफर होती, असा खळबळजनक दावा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी (दि.१७) इथे केला. त्यासंदर्भात पुरावे गोळा करून लवकरच माध्यमांसमोर सविस्तर माहिती उघड करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रहारच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुली शाहिरी पोवाडा स्पर्धेसाठी ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते.
काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप करत अनेक पुरावे समोर आणले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार शरद पवार यांनीही मला दोन जण भेटले होते, त्यांनी १६० जागा निवडून आणण्याची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आता माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही असाच दावा केला आहे. रविवारी शहरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,
लोकशाहीत मतदान हा आत्मा आहे. हा मतदानाचा आत्माच आता गायब केलाय. त्यामुळे विरोधातच निकाल येणार असल्याने निवडणूक लढावे की नाही, असा प्रश्न पडला आहे. हा गंभीर विषय आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी मलाही तुम्हाला न भेटणारे मतदानाची यादी काढा, ते १० हजार मते काढून आणि दुसरे मते टाकू, अशी ऑफर होती. मात्र ते पटले नाही. आता त्यासंदर्भातील पुरावे जमा करून माहिती जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रहारचे शहराध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांची उपस्थिती होती.
ईव्हीएम मशीन असल्याने निवडणुकीत आता जास्त मेहनतीची गरज नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी भाजपला लगावला. मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातून मतदान सुरू करा, अशी मागणीही त्यांनी केली.
सरसकट कर्जमाफीसाठी प्रहारचा लढा सुरू आहे. यासह मेंढपाळ, दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी सुरू केलेले आंदोलन कसे व्यवस्थित नेता येईल, यावरच आमचे लक्ष आहे. आता वेगळ्या ताकदीने आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीसह आमच्या इतर मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला बाध्य करेल, असेही कडू यांनी सांगितले.