Sambhajinagar News : १७८ वर्षांपासून त्यांचा भाकरीचा गोपाळकाला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : १७८ वर्षांपासून त्यांचा भाकरीचा गोपाळकाला

अखंड हरिनाम सप्ताहात सुंदराबाई परिवार बनतो स्वच्छतादूत

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Sadguru Yogiraj Gangagiri Maharaj's Akhand Harinam Week

रमाकांत बन्सोड

गंगापूर : सद्‌गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताहातील स्वच्छता करणे, सप्ताह परिसरात कोणाला प्रातर्विधी, लघुशंका न करू देणे, प्रहारा मंडपात, संतकुटीत व सप्ताह परिसरात चप्पल अथवा बूट वापरू न देणे आणि पत्रावळी उचलणे, सप्ताहाच्या काळात भाकरीचा गोपाळकाला करणे अशी वर्षानुवर्षे १७८ वर्षांची अखंड परंपरा आजोबा-पणजोबांच्या काळापासून आजही एक कुटुंब जपत आहे. येवला तालुक्यातील सावरगाव (गोपाळवाडी) येथील कुटुंब साप्ताहात आपली भूमिका इमानेइतबारे जपत आहेत.

गोपाळवाडी येथील या स्वच्छतादूताची १७८ वर्षांची परंपरा असून, पूर्वी दिवंगत सुंदराबाई राजाराम ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आता सध्याला त्यांचे जावई सजन शंकर वाघ व मुलगा फुलचंद राजाराम ठाकरे हे वारसदार म्हणून ही जबाबदारी पार पाडीत आहेत. येवला तालुक्यातील सावरगाव (गोपाळवाडी) परिसरातील शंभराच्यावर संख्या असलेले हे कुटुंब असून, त्यात महिला, पुरुष व लहान मुले व मुली मिळून हे काम करतात. त्यांना वडिलोपार्जित प्रत्येकी ५ ते ७ एकर जमीन असून पाणीटंचाई व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे त्यांनी सरकारी अनुदानावर विहिरी खोदल्या आहेत. आपल्या आजी, आजोबा, पणजोबांची ही परंपरा खंडित होऊ नये, म्हणून ते वर्षानुवर्षे सप्ताहात स्वच्छतादूताद्वारे आपली सेवा देतात.

स्वच्छतेला पहिले प्राधान्य

हातात बांबूची काठी घेऊन सप्ताह परिसरात ठरवून दिलेल्या जागेवर टेहाळणीचे काम हे करतात. सप्ताहकाळात त्यांचा दिनक्रम पहाटे ४ वाजता सुरू होतो. पहाटे सप्ताह परिसरात कोणीही घाण करू नये, तसेच सप्ताहातील पत्रावळ्या व इतर केरकचरा झाडून स्वच्छ करून सकाळी पंगतीचे मैदान तसेच सप्ताह परिसरात स्वच्छता करतात.

असा असतो गोपाळकाला

सध्या शनिदेवगाव व सप्तकृषी मध्ये गोदावरी तीरी सुरू असलेल्या १७८ व्या गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांनी आणलेल्या लाखो भाकरींचा महाप्रसाद असतो. शिल्लक भाकरी आम्ही सर्व कुटुंब पोत्याच्या व पाटीच्या मापाने वाटून घेऊन त्या दोन दिवस कडक ठणठणीत उन्हात वाळवितो. त्यानंतर खलबत्यात कुटून त्याचा बारीक भुगा करतो आणि साठवून ठेवतो.

दररोज त्यास मसाला टाकून त्या खाण्यायोग्य बनवतो. आमचे पूर्वज या भाकरी पूर्वी वर्षभर खात, पण आता कुटुंबाची संख्या वाढल्यामुळे आता या भाकरी आम्हाला २-३ महिने पुरतात.

याच भाकरीला आम्ही गोपाळकाला म्हणतो. गोदा धाम सरला बेटातील महाराज सप्ताहसाठी सप्ताह समितीला आमचाच आग्रह धरतात, अशी माहिती सुंदराबाई यांचा मुलगा फुलचंद व जावई सजन यांनी दिली.

प्रत्येक पिढीने प्रामाणिकपणे बजावली भूमिका

दिवंगत सुंदराबाई यांचा मुलगा फुलचंद व जावई सजन म्हणाले, सप्ताहाची आमची ही १७८ वर्षाची परंपरा आहे. पूर्वी दुष्काळाची परिस्थिती होती. पुरेसे अन्नही मिळत नव्हते, याच कारणावरून सदृरू गंगागिरी महाराजांनी सप्ताहाची ही परंपरा सुरू केली. यावेळी सुंदराबाई राजाराम ठाकरे यांचे वंशज या सप्ताहात स्वच्छतेचे काम करत होते. त्यावेळेस कोणतेही मानधन नव्हते. हीच परंपरा सलग सुरू झाली.

प्रत्येक पिढीने हे काम प्रामाणिकपणे केले. यासाठी सप्ताह समिती सप्ताहापूर्वी आम्हाला भेटतात. यासाठी आता बिदागी ठरविली जाते. तसेच आम्हाला ट्रकद्वारे ने-आण करून सप्ताहाच्या ठिकाणी आमच्या जे-वणापासून चहा, दूध, साखर सप्ताह समिती पुरविते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT