छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रमाई आवास योजनेची जुनी ऑफलाईन यादी रद्द करून ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी प्रत्यक्ष कागदपत्रे सादरीकरणात अपेक्षित उत्साह दिसून आला नसल्याचे समोर आले आहे. या योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे साडेआठ हजारांपैकी तीन हजार अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याने उर्वरित अर्ज प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे या योजनेची मुदत वाढवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यंदापासून रमाई घरकुल योजनेची संपूर्ण प्रक्रिया महापालिकेकडून ऑनलाईन करण्यात आली आहे. याअ ाधीची ऑफलाईन यादी अपूर्ण व त्रुटीपूर्ण असल्याने ती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला नव्या पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात आले. या प्रणालीला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ८,४४२ अर्ज प्राप्त झाले. मात्र पुढील टप्प्यातील पडताळ-णीदरम्यान मोठी तफावत समोर आली आहे. आतापर्यंत केवळ २,९७३ अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली असून, उर्वरित अर्जदारांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
त्यामुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महापालिकेने केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पडताळणी वरही भर दिला आहे. मनपाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी भेट देऊन अर्जदारांची आर्थिक स्थिती, वास्तव निवास आणि घरकुलासाठी जागेची उपलब्धता यांची तपासणी करत आहेत.
या सर्व निकषांच्या आधारे अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. मात्र जुनी ऑफलाईन यादी रद्द करण्याच्या निर्णयावर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे गरजू बोगस लाभार्थ्यांन चाप बसणार असून गरजू लाभार्थ्यांचा फायदा होणार असल्याचे सागण्यात येत आहे.
अर्ज व पडताळणीची सद्यस्थिती
एकूण ऑनलाईन अर्ज : ८,४४२
कागदपत्रे सादर : २,९७३
प्रलंबित अर्ज: ५००० पेक्षा अधिक