Sambhajinagar News: Work on connecting main water pipeline begins without shutdown
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान टाकलेली मुख्य २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडणी कवडगाव आणि टाकळी फाटा या दोन ठिकाणी जोडण्यात येत आहे. या कामाला शनिवारी सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. या कामासाठी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर ६ दिवसांचा शटडाऊन घेतला जाणार होता. परंतु, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे शटडाऊनविनाच काम सुरू करण्यात आल्याने शहराचा पाणीपुरवठा तुर्तास सुरळीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करुन १३ सप्टेंबरपासून सहा दिवस ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद ठेवण्याची मागणी केली होती. मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी जोडण्यासाठी हा शटडाऊन घेतला जात आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने शटडाऊनला मंजूरी दिली.
हे काम शटडाऊनविनाच व्हावे, यासाठी महापालिका पाणीप-रवठा विभागाकडून सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, एमजेपीचे अधिकारी शटडाऊनवर ठाम होते. त्यामुळे शनिवारी एमजेपीच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हे काम सुरू झाले. तेव्हा महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी देखील तेथे तैनात होते. त्यांनी केलेल्या सूचनेमुळे कंत्राटदाराच्या कामगारांनी शटडाऊविनाच खोदकाम सुरू केले. आता प्रत्यक्षात जेव्हा शटडाऊनची आवश्यक्ता असेल. तेव्हाच तो घेतला जाणार असल्याने शहरवासीयांवर निर्माण होणारे पाणी कपातीच संकट तूर्तास दूर झाले आहे.
९ ठिकाणी जोडणी शिल्लक
पैठण रस्त्यावर ज्या ठिकाणी ही मुख्य जलवाहिनी जोडली जात आहे. तेथे सुमारे ३१ मीटर लांबीचा पाईप टाकून तो मुख्य जलवाहिनीला दोन्ही बाजूने जोडला जाणार आहे. याशिवाय आणखी ८ ते ९ ठिकाणी जलवाहिनी जोडणीचे काम शिल्लक आहे. परंतु, कवडगाव आणि टाकळी फाटा या दोन ठिकाणच्या जोडणीसाठीच शटडाऊनची गरज आहे.