

Correction in the map-extent of the wards is in the final stage.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेवर प्राप्त ५५२ हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात सर्वाधिक आक्षेप नकाशे आणि व्याप्तीतील चूकांवर असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे प्रशासकांच्या आदेशाने महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रभाग रचनेतील या चुकांची तपासणी केली आहे. आता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवारपर्यंत हा सुधारित आर ाखडा शासनाला सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्य शासन, निवडणूक आयोग यांच्या आदेशाने प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार केला. मात्र, ऐनवेळी दुरुस्ती करुनही प्रशासनाने या प्रभाग रचनेचे नकाशे आणि त्यातील व्याप्तीमध्ये चुका केल्या. त्यामुळे जवळपास सर्वच प्रभागांचे नकाशे हे व्याप्तीशी जुळत नसल्याची ओरड सुरू झाली. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त आणि इच्छुकांच्या लक्षात हा प्रकार आला.
त्यामुळे सर्वाधिक हरकती या नकाशे आणि व्याप्तीवरच दाखल झाल्या. सुनावणीमध्ये हा प्रकार प्रशासक जी. श्रीकांत यांच्या लक्षात आला. त्यांनी सुनावणी संपल्यानंतर लागतीच अधिकाऱ्यांना नकाशे आणि व्याप्तीच्या तपासणीमध्ये खरोखरच चूक झाली आहे का, हे शोधण्याचे आदेश दिले. त्यासाठी १० पथक तयार करुन त्यांना काय काम करायचे, याबाबत सूचना केली. त्यानुसार मागील चार दिवसांपासून काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी (दि. १५) दुरुस्तीसह अहवाल शासनाला सादर केले जाण्याची शक्यता आहे.
प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर ब्लॉक अर्ध्यातूनच तोडला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची विभागणी केली, काही प्रभाग कमी अंतराचे आणि काहींचा आकार हा आवश्यकते-पेक्षा मोठा असल्याच्या देखील हरकती होत्या. परंतु, प्रशासन हे केवळ नकाशे व्याप्तीमध्येच दुरुस्ती करणार असल्याची चर्चा इच्छुकांमध्ये आहे.